ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्रात महायुती असणार की महाविकास आघाडी? काय सांगतात विविध संस्थांचे एक्झिट पोलचे अंदाज?

भारतात पुढचं सरकार कुणाचं येणार? या प्रश्नाचं सुस्पष्ट उत्तर मिळण्यासाठी काही तास उरले आहेत. कारण 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.मात्र, आज लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले. निवडणूक निकालाचा अंदाज येण्यासाठी एक्झिट पोलकडे पाहिलं जातं. अर्थात, एक्झिट पोल अनेकदा चुकीचेही ठरल्याचे दिसून आले आहेत.वेगवेगळ्या संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं (NDA) सरकार येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

असं असलं तरी महाराष्ट्र मात्र एनडीएसाठी आव्हानात्मक ठरल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसून येतंय. कारण महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला अपेक्षित यश एक्झिट पोलमधून तरी मिळाल्याचं दिसून येत नाहीय.बहुतेक सर्वेक्षण संस्थांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीला 50-50 टक्के जागा येण्याचा अंदाज वर्तवलाय.महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांबाबत अनेक धक्कादायक निकाल एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आले आहेत. महाराष्ट्राबाबत वेगवेगळ्या संस्थांनी वर्तवलेले निकाल खालीलप्रमाणे :

एबीपी सी-व्होटरचा अंदाज
एबीपी सी-व्होटर या संस्थेने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील अंदाजानुसार, महाराष्ट्रात महायुतीला 22 ते 26 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीच्या पारड्यात 23 ते 24 जागा मिळतील.

या एक्झिट पोलमधली महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपला एकूण 17 जागा देण्यात आल्या आहेत, तर दुसऱ्या स्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 9 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शिंदे गटाला 6, अजित पवार गटाला 1, शरद पवार गटाला 6, काँग्रेसला 8 आणि एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

टीव्ही नाईन-पोलस्ट्रॅटचा अंदाज
टीव्ही नाईन-पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुतीला 22 जागा, तर महाविकास आघाडीला एकूण 25 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पक्षनिहाय आकड्यांचा विचार केला तर टीव्ही-नाईन-पोलस्ट्रॅटच्या आकडेवारीनुसार :

भाजप – 18 जागा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 14 जागा
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) – 6 जागा
शिवसेना (शिंदे गट) – 4 जागा
काँग्रेस – 5 जागा
अपक्ष – एक जागा
चाणक्य आणि द स्ट्रेलिमाचा अंदाज
चाणक्य या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, एक्झिट पोलमध्ये महायुतीला 28 ते 38 जागा मिळतील. महाविकास आघाडीला 10 ते 20 जागा आणि अपक्ष उमेदवाराला एकही जागा मिळणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

द स्ट्रेलीमा या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार महायुतीला 24 ते 27, महाविकास आघाडीला 20 ते 23 जागा आणि एक सांगलीची जागा मात्र अपक्ष उमेदवार म्हणजेच विशाल पाटील यांच्याकडे जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

न्यूज 18 च्या एक्झिट पोलनुसार महायुतीला जास्त जागा
न्यूज-18च्या एक्झिट पोल नुसार महायुतीला 32 ते 35 जागा आणि मविआला 15 ते 18 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

असं असलं तरी न्यूज 18 च्या जागांची बेरीज ही महाराष्ट्रातील एकूण मतदारसंघांच्या आकड्यांच्या पलीकडे जात आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button