लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार आज संपणार आहे. त्यापूर्वी इंडिया आघाडीची पत्रकार परिषद शनिवारी झाली. पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील अनेक योजनांचा उल्लेख केला. कर्नाटकात सुरु केलेली गॅरंटी देशभर देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी बोलताना महिलांना वर्षाला एक लाख कोटी रुपये देणार असल्याचे ते बोलून गेले. त्यानंतर त्यांना आपली चूक लक्षात आली आणि एक लाख कोटी ऐवजी एक लाख रुपये देणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी केले.
नेमके काय म्हणाले खरगे
खरगे म्हणाले की, काँग्रेस सरकारने कर्नाटकमधून गॅरंटी योजना सुरु केली आहे. या योजनेसंदर्भात इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांशी चर्चा केली. त्यानंतर ऑल इंडिया पातळीवर ही गॅरंटी करण्याचा उल्लेख आम्ही जाहीरनाम्यात केला आहे. त्यानुसार, महालक्ष्मी योजनेतंर्गत एक लाख कोटी रुपये दरवर्षी घरातील प्रमुख महिलेस देण्यात येणार आहे. खरगे यांना आपली चूक लक्षात येताच सॉरी, एक लाख रुपये…असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच २५ लाखांचा आरोग्य विमा देण्यात येणार आहे. ३० लाख जागांवर भरती करण्यात येणार आहे. मनरेगाच्या धर्तीवर शहरातील लोकांना रोजगार देणार आहे. बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देणार आहे. तसेच वर्षाला एक लाख रुपये स्टायपेंड देणार आहे.
किती जागा जिंकणार
खरगे यांनी मोदी सरकारवर टीका केली. पक्ष फोडून खऱ्या पक्षाचे चिन्ह फुटलेल्या पक्षांना दिले जात आहे. सर्व काही मोदी यांच्या इशाऱ्यावरुन सुरु आहे. ते जे सांगतात तेच होते. परंतु यंदा निवडणुकीत ते होणार नाही. या लढाईत जनता जिंकणार आहे. मोदी सरकारवर जनता नाराज आहे. यावेळी त्यांनी ईडी, सीबीआयचा दुरुपयोग मोदी सरकारकडून होत आहे. अनेकांना ते धमक्या देत आहे. आता त्यांची ही धमकी जास्त काळ चालणार नाही. महाराष्ट्रात ४८ पैकी ४६ जागा आघाडी जिंकणार आहे. त्यांना शून्य तर मिळणार नाही, एक-दोन जागांवर मिळणार आहे.