नीरज चोप्राची पत्नी हिमानी नेमकी आहे तरी कोण?

0
271

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने त्याच्या जीवनातील नव्या अध्यायाची सुरूवात केली आहे. नीरज चोप्रा खाजगी समारंभात लग्नबंधनात अडकला आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरजने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली. त्याने फोटो शेअर करत आपल्या पत्नीचे नाव हिमानी असल्याचे सांगितले.

 

नीरज चोप्राच्या पत्नीचं नाव हिमानी मोर असं आहे. हिमानी मोर नीरज प्रमाणे हरियाणाची आहे. नीरज हा हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावचा रहिवासी आहे, तर हिमानी सोनीपत जिल्ह्यातील लाडसौली गावची आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हिमानीदेखील नीरजप्रमाणे क्रीडा क्षेत्रातील आहे.

 

हिमानी मोरेने साउथईस्टर्न लुईझियाना विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. ती एक टेनिसपटू आहे. तिने फ्रँकलिन पियर्स विद्यापीठात टेनिसमध्ये अर्धवेळ सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले. हिमानी एमहर्स्ट कॉलेजच्या महिला टेनिस संघाचे व्यवस्थापन करते. ती प्रशिक्षण, वेळापत्रक, भरती आणि बजेटिंगची देखरेख करते. मॅककॉर्मॅक इसेनबर्ग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून ती स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स ऑफ सायन्स करत आहे.

 

नीरज चोप्राचे काका भीम यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, नीरज आणि हिमानीने भारतात लग्न केले आणि ते हनीमूनला गेले आहेत. नीरजचे काका म्हणाले, “हो, दोन दिवसांपूर्वी त्यांचे भारतात लग्न झाले. लग्न कुठे झाले ते मी सांगू शकत नाही. मुलगी सोनीपतची असून ती अमेरिकेत शिकत आहे. ते हनिमूनसाठी देशाबाहेर गेले आहेत आणि ते कुठे जात आहेत हे मला माहीत नाही.”