कुठे प्रमोशन, कुठे डिमोशन! मनसेची निवडणूक तयारी जोमात; ‘शिवतीर्थ’वर रणनीतीची बैठक

0
53

माणदेश एक्स्प्रेस न्यूज| मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक फेरबदल सुरू केले असून काहींना बढती, काहींना पदावनती, तर काहींना जबाबदाऱ्या बदलण्याचे संकेत पक्षाकडून मिळत आहेत. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी ‘शिवतीर्थ’वर झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत केंद्रीय निरीक्षक व विभाग प्रमुखांसोबत सखोल चर्चा करण्यात आली.

 

या बैठकीत राज ठाकरे यांनी स्पष्ट आदेश दिले की, उपविभागप्रमुख, शाखा व गटप्रमुख यांची मते जाणून घेत, त्यांच्या अनुभवावर आधारित एक अंतिम मसुदा तयार करावा. या अहवालाच्या आधारे पक्षातील रिक्त पदांवर नवीन नियुक्त्या, काहींना वरिष्ठ पदावर बढती, तर निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची पदावनती केली जाणार आहे.

 

या बैठकीला अमित ठाकरे, मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे, प्रवक्ते अविनाश जाधव, यशवंत किल्लेदार, संजय जामदार, बंटी म्हशीलकर आदी मान्यवर उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी पदनिहाय केंद्रीय समित्या नेमल्या असून, या समित्यांनी विभाग प्रमुख ते गटप्रमुखांपर्यंत संवाद साधून अहवाल तयार केला आहे. मात्र, केंद्रीय व विभागीय समित्यांचे सदस्य वेगवेगळे असल्यामुळे या दोघांत समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.

 

येत्या १२ जूनला शाखाध्यक्ष व उपशाखाध्यक्षांची बैठक होणार असून त्यासाठी स्वतंत्र अहवाल तयार करून त्याचा अंतिम मसुदा लवकरच राज ठाकरे यांच्यासमोर सादर केला जाणार आहे. मनसेच्या संघटनेत नवीन उर्जा आणि कार्यक्षमतेने निवडणूक लढवण्यासाठी हा संपूर्ण फेरबदल महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here