वजन कमी करण्यास प्रवाभी ठरत असलेला हा मोनोट्रॉफिक डाएट प्लॅन नेमका कसा असतो आणि यामुळे शरीरास कोणते फायदे तोटे होतात जाणून घेऊ…
मोनोट्रॉफिक डाएटमुळे वजन होत कमी?
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. पाल मणिकम यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये माहिती दिली की, अशा खाण्याच्या पद्धतीला मोनोट्रॉफिक डाएट असे म्हणतात. ही शरीरातील फॅट कमी करण्याची एक प्रभावी पद्धत आहे. सोपे, सोयीचे आणि महत्त्वाचे म्हणजे या पद्धतीच्या आहारामुळे तुम्ही रोज प्रमाणातच खाता. यामुळे थकवा कमी होतो आणि तुम्हाला अधिक खाण्याच्या सवयीपासून दूर राहता येते. पण, या पद्धतीचा डाएट प्लॅन करण्याआधी तुम्ही ठरवलेल्या पदार्थांमध्ये सर्व आवश्यक पोषक घटक आहेत ना हे सुनिश्चित करा, असेही डॉ. मणिकम म्हणाले.
पोटाच्या आरोग्याचे तज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ पायल कोठारी यांनी सांगितले की, प्रत्येक जेवणात फक्त एक प्रकारचा आहार घेणे फायद्याचे की तोट्याचे हे तुमच्या किमान जीवनशैली आणि खाण्याच्या पद्धतीवर आधारित आहे.
मोनोट्रॉफिक डाएट खरंच फायदेशीर आहे का?
अशाप्रकारच्या आहाराने पचनक्रिया सुलभ होते, ज्यामुळे शरीराला पोषक तत्वे कार्यक्षमतेने शोषून घेता येतात, असे सांगितले जाते. पण, रोज एकप्रकारचे अन्न खाल्ल्याने काहींना पचन संस्थेसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. ज्यात सूज येणे, अस्वस्थता जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात, असेही कोठारी यांनी स्पष्ट केले.
मोनोट्रॉफिक डाएटचा एक फायदा म्हणजे पचनक्रिया सुलभ होते. कारण शरीराला एकाच प्रकारचे अन्न विघटन करण्यासाठी विशिष्ट एंजाइम तयार करण्याची आवश्यकता असते. कोठारी यांच्या मते, यामुळे पोषकतत्त्वांचे चांगले शोषण होऊ शकते.
डॉ. मणिकम यांच्या मतांशी सहमती दर्शवत कोठारी म्हणाले की, यामुळे थकवा कमी होण्यासह मनात सुरू असलेला गोंधळही कमी होतो. यामुळे बरेच जण अशाप्रकारचा आहार घेतात. पण यात फळे, भाज्या किंवा लीन प्रोटीनयुक्त आणि पौष्टिक पदार्थांवर भर दिला पाहिजे, ज्यातून तुम्हाला जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर आवश्यक पोषक तत्व मिळू शकतात.
पण, कोणत्या गोष्टी किती प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत याचे प्रमाण ठरवा, कारण कोणत्याही गोष्टींचा अतिरेक म्हणजे जास्त कॅलरीज वाढवण्यास हातभार लावतात, असेही कोठारी यांनी नमूद केले.
कोठारी यांनी असेही नमूद केले की, मोनोट्रॉफिक डाएटमुळे काही लोकांना शरीरास आवश्यक पोषक तत्वे मिळत नाहीत. यामुळे या डाएटचे काही अल्पकालीन फायदे असू शकतात, परंतु शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी एक संतुलित आहार गरजेचा आहे, ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत राहते. पण, हा डाएट खरंच मनापासून केलात तर शरीरास फायदेशीरही ठरू शकतो, असेही कोठारी म्हणाल्या.