
मुंबई | प्रतिनिधी
मराठी भाषेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे २० वर्षांनंतर एका मंचावर एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर, भाजपने या एकजुटीवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “भाषेचं प्रेम नव्हेच… ही तर निवडणुकीसाठी ‘कुटुंब तहात’ एकत्र येण्याची धडपड आहे!”, अशा शब्दांत भाजप नेते आशिष शेलार आणि प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हल्लाबोल केला आहे.
“स्नेहमेळावा नव्हे, निवडणुकीसाठी ‘भाऊबंदकी’चा कार्यक्रम” – शेलार
भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरून पोस्ट करत म्हटले,
“भाषेसाठी नाही, ही तर निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी आहे! महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत आणि पराभवाची भीती वाटू लागल्यामुळे ‘उबाठा सेनेला’ भाऊबंदकी आठवली आहे. ज्या भावाला घराबाहेर काढलं, त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठीच वरळीचा कार्यक्रम ठेवण्यात आला.”
शेलार यांच्या म्हणण्यानुसार, या कार्यक्रमाचा भाषेशी काहीही संबंध नव्हता. हा ‘कौटुंबिक स्नेह मेळावा’ होता, मराठी अस्मितेचा नव्हे.
“मराठीसाठी कार्यक्रम? धोरण? दिशा? उत्तर – नाही!” – उपाध्ये यांचा सवाल
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही या मेळाव्यावर सडकून टीका केली.
“वाजत गाजत दोघांनी भाषणं केली, पण मराठीसाठी काय ठोस कार्यक्रम जाहीर केला?
मराठी भाषा विकासासाठी काय धोरण?
मराठी युवकांसाठी कोणती दिशा?
कोणताही उत्तर नाही,” अशी टीका उपाध्ये यांनी केली.
उपाध्ये म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे भाषण भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यापुरतेच मर्यादित होते.
“महापालिकेसाठीच नाही, राज्यासाठीही एकत्र आलो” – उद्धव ठाकरे यांची कबुली?
या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाषणात सांगितले होते की, “एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी.” भाजपच्या मते, ही महापालिकेची सत्ता पुन्हा मिळवण्यासाठीची युती असून मराठी अस्मिता ही केवळ निमित्त आहे.
राजकीय समीकरणांमध्ये गरम झालं वातावरण
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, भाजपने याला ‘राजकीय स्वार्थाची युती’ ठरवत टीकास्त्र सुरू केले आहे. महापालिका निवडणुका तोंडावर असतानाच ही युती पुढे काय वळण घेते, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.