महाविकास आघाडीची पत्रकार परिषद काल मुंबईत पार पडली. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार ‘काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह मविआचे विविध नेते उपस्थित होते. राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार असल्याचं या पत्रकार परिषदेतून स्पष्ट करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर सांगली लोकसभा निवडणुकीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी सांगलीत 2 विधानसभा मतदारसंघातून आमच्या पक्षाचे उमेदवार असतील, असं म्हटलं.
सांगली जिल्ह्यात विधानसभा लढवण्यावरून महाविकास आघाडीतील तिढा वाढणार की सामंजस्यानं मार्ग काढला जाणार हे पाहावं लागणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात किती जागा लढवणार याबाबत भाष्य केलं होतं. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून सांगली जिल्ह्यातील 2 विधानसभा जागा लढवण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सांगली जिल्ह्यामध्ये दोन विधानसभा जागा लढवणार असल्याचं लोकसभा लढवणाऱ्या चंद्रहार पाटील यांनी म्हटलं. खानापूर – आटपाडी आणि मिरज या दोन विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचं ते म्हणाले.
लोकसभेत शिवसेना पक्षाबरोबरच महाविकास आघाडीशी काँग्रेस राष्ट्रवादीने गद्दारी केली होती. त्याबाबाबत उद्धव ठाकरेंनी मोठ्या मनानं काँग्रेस राष्ट्रवादीला माफ देखील केलं. मात्र, भविष्यात जर त्या पद्धतीने प्रयत्न झाला तर याची किंमत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोजावी लागेल, असा इशारा चंद्रहार पाटील यांनी दिला.
शिवसेना पक्षाच्या दोन मूळच्या जागा आहेत. खानापूर आटपाडी आणि मिरज मतदारसंघातून आम्ही निवडणूक लढवणार आहोत, असं चंद्रहार पाटील म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रामाणिकपणे प्रचारसभा घेतल्या. शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीच्या प्रचारात उतरले पण सांगलीत असं चित्र पाहायला मिळालं नाही. काँग्रेसचे नेते प्रचारात उतरले नाहीत. शरद पवार यांची सभा झाली पण मतांमध्ये त्याचा परिणाम दिसला नाही, असं चंद्रहार पाटील म्हणाले.
सांगली जिल्ह्यात खानापूर आटपाडी आणि मिरज मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार उभे राहतील, असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे.