धोक्याची घंटा! पुन्हा कोरोना वाढतोय; रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ, तज्ज्ञांचा सतर्कतेचा सल्ला

0
375

माणदेश एक्सप्रेस न्युज|नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा पुन्हा एकदा प्रभाव दिसून येत आहे. आशियातील अनेक देशांमध्ये रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असून, भारतातही किरकोळ प्रमाणात वाढ नोंदवली जात आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते ही वाढ सध्या नियंत्रणात असून, घाबरण्याचं कारण नाही. नागरिकांनी सावध राहण्याचा आणि मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि थायलंडसारख्या देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. सिंगापूरमध्येच आठवडाभरात २८ टक्क्यांनी रुग्णसंख्या वाढली असून, एप्रिलच्या अखेरीस ११,१०० रुग्ण असताना मेच्या पहिल्या आठवड्यात ही संख्या १४,२०० वर पोहोचली. रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही ३० टक्क्यांनी वाढले आहे. हाँगकाँगमध्ये ३ मे रोजी संपलेल्या आठवड्यात कोरोनाशी संबंधित ३१ मृत्यूंची नोंद झाली आहे.

 

नवीन ओमायक्रॉन सबव्हेरिएंट – JN.1, LF.7 आणि NB.1.8 – यामुळे संक्रमण वाढत असल्याचे समोर आले आहे. मात्र, बहुतेक रुग्ण सौम्य लक्षणांसह आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासत नाही, असे डॉक्टर सांगत आहेत.

 

भारताच्यादृष्टीने दिलासादायक बाब म्हणजे १९ मे रोजी आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार देशभरात केवळ २५७ अॅदक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
एम्स, नवी दिल्ली येथील सेंटर फॉर कम्युनिटी मेडिसिनचे डॉ. हर्षल साळवे यांनी सांगितले की, “आशियात वाढणारी प्रकरणं ही बहुतांश सौम्य स्वरूपाची आहेत. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, मात्र सतर्क राहणं आवश्यक आहे.”

 

 

केरळ आयएमए संशोधन कक्षाचे संयोजक डॉ. राजीव जयदेवन यांनी सांगितले की, “लसीकरण आणि पूर्वीच्या संसर्गामुळे लोकांची रोगप्रतिकारशक्ती सुधारली आहे. त्यामुळे आता कोरोना पूर्वीसारखा घातक नाही. मात्र, वृद्ध व्यक्ती आणि सहव्याधी असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.”

 

डॉ. जयदेवन यांनी पुढे सांगितले, “गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं, ताप असल्यास घरातच राहणं आणि इतरांपासून अंतर राखणं ही खबरदारी उपयुक्त ठरेल. संसर्ग पसरू नये म्हणून प्रत्येकाने जबाबदारीने वागणं गरजेचं आहे.”

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here