साताऱ्यातील संग्रहालयात वाघनखांचा आज शेवटचा मुक्काम, ‘वाघनखां’ची जागा घेणार शिवरायांच्या हाताच्या पंजाचा ठसा

0
135

माणदेश एक्सप्रेस/सातारा : साताऱ्यातील संग्रहालयात गेल्या सहा महिन्यांपासून विसावलेल्या ऐतिहासिक वाघनखांचा शुक्रवारी (दि. ३१) शेवटचा मुक्काम आहे. दि. १ फेब्रुवारी रोजी ही वाघनखे नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात आठ महिन्यांसाठी विसावा घेणार आहेत.

 

वाघनखांची उणीव भरून काढण्यासाठी संग्रहालयातील ‘त्या’ दालनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हाताचा ठसा, साताऱ्याचे संस्थापक शाहू महाराज यांचा बिचवा अथवा शिवकालीन एकधारी वाघनख ठेवण्याबाबत पुरातत्व विभागाकडून विचारमंथन सुरू आहे.लंडन येथील व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यातील संग्रहालयात दि. १९ जुलै २०२४ रोजी दाखल झाली. दि. २३ जुलैपासून ही वाघनखे तसेच शिवशस्त्र शौर्यगाथा हे शस्त्र प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले.

 

पुरातत्व विभाग व राज्य शासनाने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार ही ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यातील मुक्कामानंतर १ फेब्रुवारी ते २ ऑक्टाेबर २०२५ पर्यंत नागपूर येथे व त्यानंतर दि. ३ ऑक्टोबर ते ३ मे २०२६ पर्यंत ती कोल्हापूर येथील संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवली जाणार आहेत.

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डाव्या हाताचा पंजा संग्रहालयात आहे. हातावर चंदनाचा लेप लावून तो ठसा कागदावर उमटविण्यात आला आहे. इतिहासतज्ज्ञ ग. ह. खरे यांनी हा ठसा त्यावरील माहितीचे वाचन केले होते. म्हसवड येथील राजमाने घराण्याकडून हा ठसा ५० वर्षांपूर्वी संग्रहालयाकडे सुपुर्द करण्यात आला. या शिवाय साताऱ्याचे संस्थापक शाहू महाराज थोरले यांचा बिचवा व शिवकालीन एकधारी वाघनख अशा ऐतिहासिक वस्तूंचे येथे संवर्धन करण्यात आले आहे. वाघनखांच्या दालनात यापैकी एक वस्तू ठेवण्याबाबत पुरातत्व विभागाकडून विचारमंथन सुरू आहे, अशी माहिती संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली.