
माणदेश एक्सप्रेस न्यूज|सांगली : लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सांगलीत लावलेला उमेदवार हा अपयशी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षातीलच नेत्यांकडून आता उघडपणे टीका होत आहे. उद्धवसेनेचे जिल्हा संघटक दिगंबर जाधव यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर थेट आरोप केले असून, “चंद्रहार पाटील यांनी पॉलिश करून दिलेल्या गदेमुळे उद्धव ठाकरे भाळले आणि घाईने उमेदवारी जाहीर केली. मात्र ही उमेदवारी पक्षासाठी घातक ठरली,” अशी टीका त्यांनी केली आहे.
दिगंबर जाधव यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “उद्धव ठाकरे आणि नितीन बानुगडे-पाटील यांना निवडणुकीपूर्वीच सूचित करण्यात आले होते की, चंद्रहार पाटील यांना ७० हजारांहून अधिक मते मिळणार नाहीत. तरीही उमेदवारी जाहीर करण्यात आली. परिणामी, डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली.”
ते पुढे म्हणाले, “चंद्रहार पाटील केवळ एकदाच जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. त्यांचे एकमेव स्वप्न म्हणजे कुस्ती केंद्र उभारणे, आणि त्यासाठी बेसुमार वाळू व सिमेंट गोळा करण्यात आले आहे. त्यांना उमेदवारी देणे म्हणजे पक्षाच्या प्रतिष्ठेचा घातच होता.”
जाधव यांनी संजय राऊतांवरही जोरदार हल्ला चढवला. “निवडणुकीच्या काळात संजय राऊत पाच दिवस सांगलीतील हॉटेलमध्ये थांबले होते. त्यामागे काय हालचाली सुरू होत्या, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यांनी जर मिरजेत तेवढा वेळ दिला असता, तर कदाचित तिथे यश मिळाले असते,” असा टोलाही त्यांनी लगावला.
शेवटी, “सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचा विस्कुट झाला असून, याला जबाबदार असलेले नेते जनतेची आणि कार्यकर्त्यांची माफी मागतील का?” असा रोखठोक सवाल दिगंबर जाधव यांनी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाच्या अंतर्गत वादांनाही उधाण येण्याची शक्यता आहे.