
माणदेश एक्स्प्रेस न्यूज| मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच दिलेला “संदेश नाही, थेट बातमी देईन” हा संदेश आणि त्यात ‘जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, तेच होईल’ हे विधान चर्चेचा विषय ठरले असतानाच आता खासदार संजय राऊत यांनी देखील स्पष्ट भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती जवळपास ‘फिक्स’ असल्याचे सूतोवाच करत, भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
सामनात छापून आलेल्या उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र फोटोबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले, “मराठी माणसाच्या मनात असलेली भावना हीच महाराष्ट्राची दिशा ठरवणारी आहे. भाजप हा शेठजींचा पक्ष आहे. महाराष्ट्राशी, मराठी अस्मितेशी त्यांना काही देणंघेणं नाही. आम्ही मात्र १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाशी बांधिलकी ठेवून चालणारे आहोत.”
“भूतकाळात न अडकता पुढे पाहा”
“२०१४, २०१७ किंवा १८५७ मध्ये काय झालं हे आम्हाला पाहायचं नाही. आम्ही भविष्याकडे पाहतो. महाराष्ट्रासाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. भाजप, देवेंद्र फडणवीस, अमित शाह महाराष्ट्राचं नुकसान करत आहेत,” असा थेट आरोप करत राऊत म्हणाले, “फडणवीस आता नवी ‘गीता’ लिहीत आहेत, जणू काही भगवंतच झाले आहेत.”
राजकीय घडामोडींना वेग
शिवसेना-मनसे युतीच्या शक्यतेवर आता सर्वच स्तरांमधून चर्चा सुरु झाली असून, महाविकास आघाडीतही या संभाव्य युतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या वक्तव्यानं ही चर्चा अधिकच गहिरी झाली आहे.