
माणदेश एक्सप्रेस/सांगली : “पाकिस्तानात जेवढे दहशतवादी नाहीत तेवढे मतांच्या राजकारणासाठी भारतात काही गद्दार तयार झाले आहेत. आता आपल्याला पाकिस्तानची चिंता राहिलेली नाही. पाकिस्तानविरोधात सीमेवर आपले जवान लढत आहेत, केंद्र सरकार ताकदीने उभं राहत आहे. आता आपली आर्मी बदलत आहे. पण मतांच्या राजकारणासाठी भारतात जन्माला आलेले गद्दार पाकिस्तानच्या दहशतवाद्यांपेक्षा जास्त घातक आहेत. याची आपण चिंता केली पाहिजे. पाकिस्तानात इसिस आहे, इराण-इराकमध्ये तालिबानी आहेत, तसंच आपल्या देशामधील काँग्रेसीही त्याच विचारांचे लोक आहेत,” असं म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. सांगलीत हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने घुसखोरमुक्त महाराष्ट्र अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी झालेल्या सभेत आमदार पडळकर बोलत होते.
गोपीचंद पडळकर पुढे बोलताना म्हणाले की, “सांगलीत आपल्याला एखाद्या हॉटेलमध्ये राहायचं असेल तरी आयडी प्रुफ लागतं. मग या देशात राहण्यासाठी तो नागरिक या देशाचा नको का? हजार-पाचशे रुपयांसाठी काही दलाल घुसखोरांना बनावट आधार आणि रेशन कार्ड काढून देत आहेत. पाकिस्तान क्रिकेट मॅच हरल्यानंतर मिरज आणि सांगलीत काही लोक घोषणा देतात. यापुढे आपण असा प्रकार चालून द्यायचा नाही. सांगलीच्या एसपींना माझं सांगणं आहे की, १००-२०० पोलिस घ्या आणि अशा घोषणा देणाऱ्या लोकांचं कबरडं मोडून काढा,” असं आवाहन पडळकर यांनी केलं आहे.
दरम्यान, “काँग्रेसच्या लोकांना देशाचं देणंघणं नाही, त्यांना फक्त मताचं देणंघेणं आहे. मतांच्या राजकारणासाठी इतिहासाची तोडमोड करायची, मतांच्या राजकारणासाठी नवीन इतिहास लिहायचा आणि जुना इतिहास मान्य नाही, असं सांगून नवीन इतिहासकार जन्माला येत आहेत,” अशी टीकाही गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.