आज मेळाव्यांचा दिवस, बाळासाहेबांच्या ९९व्या जयंतीनिमित्त दोन्ही सेनांचे शक्तिप्रदर्शन

0
120

माणदेश एक्सप्रेस/मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त आज, गुरुवारी उद्धवसेना आणि शिंदेसेनेचे दोन स्वतंत्र अभिवादन मेळावे होणार आहेत. या मेळाव्यांतून दोन्ही सेना शक्तिप्रदर्शन करणार आहेत. अंधेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या उद्धवसेनेच्या महामेळाव्याला उद्धव ठाकरे, तर शिंदेसेनेच्या बीकेसीतील मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.

 

शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त कलानगरमध्ये दोन्ही सेनांनी बॅनरबाजी केली आहे. उद्धवसेनेचे विभागप्रमुख आ. अनिल परब यांनी लावलेल्या बॅनर्सवर मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे, तर शिंदेसेनेचे नेते कुणाल सरमळकर यांनी बीकेसीत होणाऱ्या शिवोत्सव मेळाव्याचा उल्लेख बॅनर्सवर केला आहे. दोन्ही सेनांच्या बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले आहे.

 

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर होणाऱ्या उद्धवसेनेच्या या पहिल्या महामेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी महापालिका निवडणूक आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ते काय भाष्य करतात, कोणती घोषणा करतात, याची शिवसैनिकांसह राजकीय निरीक्षकांना उत्सुकता आहे. शिवसेना नेत्यांसह राज्यातील प्रमुख पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहतील. यावेळी शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट उलगडणारी छायाचित्रे आणि चित्रफीत दाखवली जाणार आहे, अशी माहिती उद्धवसेनेचे खा. अरविंद सावंत यांनी दिली.

 

बीकेसीत होणाऱ्या शिंदेसेनेच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकविण्याची प्रतिज्ञा करण्यात येणार आहे, अशी माहिती शिंदेसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी पत्रकार परिषदेत दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही, असे म्हटले होते. मात्र, आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला काँग्रेस पक्षाच्या दावणीला बांधले आहे.(स्त्रोत-लोकमत)