बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम काही दिवसांपूर्वी आर्टिकल 370 (Article 370) या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नेंसीमुळे सर्वांचे लक्ष वेधले होते. आता यामी गौतम आणि आदित्य धर आई-वडील झाल्याची ही आनंदाची बातमी अभिनेत्रीने चाहत्यांशी शेअर केली आहे. या जोडप्याचे हे पहिलेच अपत्य आहे.
यामी गौतमने सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर करून आई झाल्याची गोड बातमी दिली आहे. अभिनेत्रीने सांगितले की, ती एका मुलाची आई झाली आहे, ज्याला तिने अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी म्हणजेच 10 मे रोजी जन्म दिला. यासोबतच यामी गौतमने तिच्या मुलाचे नावही उघड केले आहे.
यामी गौतम आणि आदित्य धर यांनी त्यांच्या मुलाचे नाव ‘वेदाविद’ ठेवले आहे. गरोदरपणाची पोस्ट शेअर करताना, जोडप्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, ‘आम्ही सूर्या हॉस्पिटलच्या अद्भुत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून आभारी आहोत. विशेषत: आम्ही डॉ. भूपेंद्र अवस्थी आणि डॉ. रंजना धनू यांचे मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो, ज्यांच्यामुळे हा एक खास दिवस आमच्या आयुष्यात येऊ शकला.’
अभिनेत्री पुढे म्हटलं आहे की, ‘आता आम्ही पालक होण्याच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात केली आहे आणि आम्ही आमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची वाट पाहत आहोत. त्याच्या जन्मामुळे आम्ही धन्य झालो आहोत, तो आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी तसेच आपल्या प्रिय देशासाठी अभिमानाचे प्रतीक बनेल या आशेने आणि आत्मविश्वासाने आम्ही पूर्ण आहोत.’