गेल्या काही वर्षात गुळाचा चहा महाराष्ट्राच्या विविध भागात चांगलाच प्रसिद्ध झाला. खरंतर ७० ते ७५ वर्षांपूर्वी पर्यंत शक्यतो गुळाचा चहा व्हायचा. कारण साखरेचे कारखाने त्यावेळेस प्रचलित नव्हते. पण दुधात गुळ टाकला की दूध नासतं हे गणित साऱ्यांनाच माहीत आहे, पण हे गणित ज्याने बिघडवण्याच्या ऐवजी घडवलं. तिथली रेसिपी कायमची चर्चेत राहिली. त्यामुळेच गेल्या काही वर्षात गुळाचा चहा चांगलाच फेमस झाला आहे. तो साऱ्यांना जमतो.. असं नाही मात्र ज्यांनी यामध्ये काही कल्पना प्रचलित आणल्या आणि त्यातून व्यवसाय केला आणि तो यशस्वी होत आहे.
उन्हाळा सुरू झाला की, सर्वांचीच पावलं वळतात ती रसवंती गृहाकडे किंवा आईस्क्रीम पार्लरकडे. उन्हाळा सुरू झाला की, साऱ्यांच्या जीभा आईस्क्रीम किंवा कुल्फी खाण्यासाठी आसुसलेल्या असतात. अशा आसुसलेल्या चोखंदळ खवय्यांसाठी गावागावात कुल्फीचे गाडे किंवा शहरांमध्ये आईस्क्रीम पार्लर कार्यरत असतात. पण या सगळ्यांमध्ये आतापर्यंत असे थंड पदार्थ बनवण्यासाठी साखरेचा सर्रास वापर केला जात आहे.
कुठे केलाय हा प्रयोग ?
दौंड तालुक्यात दौंड शहरापासून काही अंतरावर असलेल्या गिरिम या गावात किरण नेमाणे राहतात. तिथेच त्यांचा शेती आणि हा कुल्फी बनवण्याचा व्यवसाय आहे. ते दूध विकत घेतात आणि त्यापासून आत्तापर्यंत साखरेची कुल्फी बनवत होते. गेल्या दोन वर्षापासून त्यांचा हा व्यवसाय चांगला चालला होता. मात्र सातत्याने ग्राहकांना नवीन काहीतरी देण्याचा उद्देश आणि हा व्यवसाय आणखी वाढला पाहिजे. या उद्देशाने नेमाणे यांनी नवीन काहीतरी करायचे ठरवले आणि त्यांच्या डोक्यात गुळाच्या कुल्फीचा प्रयोग आला.
त्यांनी अनेक ठिकाणी याविषयी चौकशी केली. गुळाचा चहा बनवणे सोपे आहे, परंतु गुळाची कुल्फी बनण्यास अवघड आहे. अशा स्वरूपाची चर्चा त्यांना ऐकायला मिळाली, तसेच त्यांनी इतर ठिकाणी संशोधन करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुधात गुळ टाकला की ते फुटते. दीर्घकाळ ठेवल्यानंतर तो पदार्थ व्यवस्थित राहत नाही, असे त्यांच्या लक्षात आले. याला कारण सध्या बाजारात जो गुळ आहे, त्याच्यामध्ये रसायनांचे प्रमाण जास्त आहे. दरम्यान २०० ते २५० गुऱ्हाळांना भेट दिली. तेथून अर्धा ते एक किलो प्रत्येक ठिकाणचा गुळ ते आणायचे आणि त्याचा प्रयोग करायचे आणि त्या गुळामुळे पुन्हा कुल्फी फुटायची किंवा नासायची असा प्रकार घडू लागला.
एक-दोन ठिकाणी मात्र विश्वसनीयरित्या रसायन न वापरणारी गुऱ्हाळे सापडली. त्या ठिकाणावरून त्यांनी गूळ घेतला. आणि त्याचा प्रयोग केल्यानंतर तो प्रयोग यशस्वी झाला. त्यानंतर गुळाची कुल्फी ही संकल्पना अमंलात आणली गेली आणि त्याच्यावरही अनेकदा चाचण्या घेऊन पूर्णपणे यशस्वी झालेली गुळाची कुल्फी त्यांनी बाजारात आणली. मागील दीड महिन्यापासून त्यांची ही गुळाची कुल्फी सध्या चांगलीच ग्राहकांमध्ये परिचित झाली आहे. पुणे, हडपसर, वाघोली, मोरगाव, केशवनगर, फुरसुंगी, उरुळी कांचन, बारामती, दौंड, श्रीगोंदा, काष्टी या भागामध्ये सध्या त्यांची कुल्फी विकली जात आहे.
गुळाच्या कुल्फीचे फायदे
गुळात साखरेपेक्षा गूळ हा शीतवर्धक असल्याचे गुण आहेत. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना अथवा साखरेचे प्रमाण शरीरात असणाऱ्या रुग्णांनाही ही कुल्फी खाण्याचा आनंद घेता येऊ शकतो. ही कुल्फी खाल्ल्याने लहान मुलांना सर्दी होत नाही, असा मेमाणे यांचा दावा आहे.