मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, शिवप्रेमींमध्ये संताप

0
627

माणदेश एक्सप्रेस न्युज : मालवण : मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या राजकोट किल्ल्यात शिवरायांचा भव्य असा पुतळा उभारण्यात आला होता. नौदल दिनाच्या दिवशी भव्य कार्यक्रम आयोजित करुन या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात आलं होतं. पण हा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आहे. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

 

विरोधकांकडून भ्रष्टाचारामुळे ही घटना घडल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, पुतळा कसा कोसळला याची सर्व कारणीमांसा जाणून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण घटनास्थळी भेट दिली आहे. राजकोट किल्ला परिसर पूर्णपणे पोलिसांनी वेढला आहे. किल्ल्याच्या आत जाण्यास मनाई करण्यात आली आहे. पुतळ्याच्या डागडुजीचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 ला नौदल दिनाच्या निमित्ताने शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण मालवणच्या समूद्र किनाऱ्यावर राजकोट किल्ला परिसरात झालं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातूंचा 35 फुटांचा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र आज दुपारच्या दरम्यान हा पुतळा कोसळला आहे. हा पुतळा उभारण्यासाठी जवळपास 5 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. हा पुतळा नौदलाने उभारला होता.