
माणदेश एक्स्प्रेस/मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, “मी बुधवारीच तुमची भेट घेणार होतो. पण अधिवेशन उशिरापर्यंत सुरु होतं. पाशवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने निरर्थक अर्थसंकल्प सादर झाला. थापा रुपाने ज्या गोष्टी मारल्या त्याची वाच्यता कुणीही केली नाही. अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं.” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
१०० दिवसांचा संकल्प या सरकारने केला होता. मात्र किती सूचना कुठल्या खात्याला दिल्या होत्या माहीत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु आहेत. हमीभाव मिळतच नाही. परदेशी विद्यापीठांना आकर्षित करणं, वनविभाग असे सगळेच मुद्दे आहेत. मात्र अर्थसंकल्पात ठोस उपाय योजना करण्यात आली नाही. १०० दिवसांचा संकल्प कुठेच दिसला नाही.
१०० दिवसांत काय घडलं? तर बीडच्या सरपंचांची हत्या झाली, सोमनाथ सूर्यवंशींची हत्या झाली. स्वारगेट बलात्कार प्रकरण घडलं. मुंबईत रस्ता घोटाळा झाला आहे. कुठल्याही गोष्टींबाबत समाधानकारक उत्तरं नाहीत. कर्जमाफी करणार होते त्याचं काय झालं? लाडक्या बहिणींना पैसे वाढवून देणार होते. त्याचंही काही झालं नाही. नको ती योजना असं बहिणी म्हणतील का? अशी वेळ येते की काय? कोरटकर सापडला पण शिक्षा काय होणार? सोलापूरकर फिरतोच आहे. जातीय दंगल नागपूरमध्ये झाली आहे हे मुद्देही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी म्हण आहे ना तशी या सरकारची अवस्था आहे. सगळी आश्वासनं फोल ठरली आहेत. सत्तेवर आल्यानंतर या सरकारची दडपशाही सुरु झाली आहे. पण दडपशाही ब्रिटिशांना जमली नाही यांनाही जमणार नाही. शिवसेना ही एकच आहे, शिवसेनेच्या गद्दारांचा गट मी मानतच नाही. आम्हाला जेव्हा मुस्लिम मतं मिळाली तेव्हा यांचे डोळे पांढरे झाले होते. मात्र बोगस हिंदुत्ववादी किंवा बुरसटलेले लोक आहेत त्यांना सौगात ए मोदीचं निर्लज्ज उदाहरण दिसलं आहे. बटेंगे तो कटेंगे चा नारा देणारे सौगात देत आहेत. वर्षभर शिमगा करायचा आणि ईद जवळ आली की मुस्लिमांना पुरणपोळी द्यायची हे यांचं धोरण आहे. भाजपाचं ढोंग उघडं पडलं आहे. मला चिंता अशी आहे मोदी लोकसभेच्या प्रचारात म्हणाले होते की मंगळसूत्र चोरतील, आता हिंदूंचं मंगळसूत्र सुरक्षित आहे का? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. सौगात ए मोदी नाही तर हा सौगात ए सत्ताचा प्रकार आहे.