मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल फोन आणलेला व्यक्ती वायकरांचा मेहुणा; रवींद्र वायकर अडचणीच येण्याची शक्यता

0
9

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा मतदारसंघांपैकी वायव्य मुंबईतील मतमोजणीवेळी सर्वाधिक चुरस दिसून आली होती. येथील अटीतटीच्या लढाईत शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव केला होता. सुरुवातीला अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र, फेरमतमोजणीत पोस्टल मतं निर्णायक ठरल्याने रवींद्र वायकर यांनी निसटता विजय मिळवला होता. मात्र, ठाकरे गटाने मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत न्यायालयात जाण्याची भाषा केली आहे. यादरम्यान मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष मतांची मोजणी होत असलेल्या खोलीत एक व्यक्ती मोबाईलवर बोलत असल्याची माहिती समोर आली होती. अमोल कीर्तिकर यांनी या व्यक्तीचा उल्लेख करत मतमोजणी कक्षात या व्यक्तीला मोबाईल आणूनच कसा दिला, हा प्रश्न उपस्थित केला होता.

या व्यक्तीबाबत आता एक नवीन माहिती समोर आली आहे. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी बोलणाऱ्या या व्यक्तीचे नाव मंगेश पंडीलकर असे आहे. पोलिसांनी तहसीलदारांच्या तक्रारीनंतर मंगेश पंडीलकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा मंगेश पंडीलकर हा दुसरा तिसरा कोणीही नसून शिंदे गटाचा उमेदवार रवींद्र वायकर यांचा मेव्हणा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

यापूर्वी वायव्य मुंबईतून निवडणूक लढवणारे हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी मतमोजणी केंद्रात मोबाईलवर बोलणाऱ्या मंगेश पंडलीकर विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करुन न घेता तहसीलदारांची तक्रार दाखल करुन घेतली. त्यामुळे भरत शाह यांना एफआयआरची प्रत मिळालेली नाही. भरत शाह यांना याप्रकरणात साक्षीदार करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांनी माझ्याऐवजी तहसीलदारांची तक्रार कशी दाखल करुन घेतली. हा सगळा प्रकार संशय उत्पन्न करणारा आहे, असे भरत शाह यांनी म्हटले. दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर वायकरांचे मेहुणे मंगेश पंडीलकर हे शनिवारी सकाळी वनराई पोलीस ठाण्यापर्यंत आले होते. मात्र, प्रसारमाध्यमांना पाहताच मंगेश पंडलीकर यांनी आपला मोर्चा आल्या पावली माघारी वळवला. त्यामुळे आता पोलीस तपासात आणखी कोणत्या गोष्टी समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here