माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी/प्रतिनिधी : 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार गोपीचंद पडळकरांनी केलेली चूक आम्ही पुन्हा त्यांना करू देणार नाही. आता कोणीही रात्रीचे पाय धरायला आले तरी कोणालाच शब्द देऊ नका असे साकडे पडळकर गटाच्या कार्यकर्त्यांनी घातले असून आता काही झाले तरी खानापूर मतदार संघाचा पुढील आमदार ब्र्म्हदेव पडळकर यांनाच करायचे असून मतदार संघातील कार्यकर्ते कामाला लागले असल्याचे भाजपचे आटपाडी तालुकाध्यक्ष जयवंत सरगर म्हणाले.
पुढे बोलताना जयवंत सरगर म्हणाले, खानापुर मतदार संघामध्ये कायम प्रस्थापित नेत्यांनीच राजकारण केले आहे. सत्ता कायम आपल्याच घरात राहिली पाहिजे यासाठी प्रसंगी कधी आटपाडीचे देशमुख व विट्याचे पाटील घराणे एकत्र आले. तर कधी आटपाडीचे देशमुख व गार्डीचे बाबर घराणे एकत्र आले आहे. मतदार संघामध्ये नवीन चेहऱ्याला कधीच यांनी वर येवू दिले नाही. १९९५ चा अपवाद वगळता कायम आमदारकी ही खानापूर तालुक्यात राहिली आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात खीळ बसली.
आटपाडी तालुक्याच्या राजकारणात आमदार गोपीचंद पडळकर यांना उदय झाल्यावर मात्र देशमुख, बाबर व पाटील यांना प्रथमच आव्हान निर्माण झाले होते. सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढविताना गोपीचंद पडळकर यांनी लक्षणीय मतदान घेत देशमुख, बाबर, पाटील गटाव्यतिरिक्त मतदार संघातील जनतेला तिसरा पर्याय दिला.
२००९ ला झालेला पराभव विसरून गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा मतदार संघामध्ये पिंजून काढत लोकांच्या अडीअडचणी समजावून घेत काम सुरु केले. २०१४ ला त्यांनी विधानसभेसाठी भाजपकडून तिकीट मिळाले. यावेळी त्यांचा मतदार संघामध्ये पराभव झाला असला तरी त्यांनी तिसऱ्या क्रमांकाचे मतदान घेतले होते. पराभवाने खचून न जाता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मतदार संघामध्ये अनेक विकासाची कामे केली. पारंपारिक विरोधक असलेल्या स्व. अनिलभाऊ बाबर यांच्या विरुद्ध त्यांनी २०१९ ची निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केली होती.
परंतु ऐनवेळी पक्षाने त्यांना बारामती मतदार संघातून भाजपकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांच्या विरोधात उभे केले. होते. त्यामुळे मतदार संघामध्ये बाबर व पाटील यांच्यामध्ये लढत झाली. या लढतीमध्ये सदाशिवराव पाटील यांचे पारडे जड होते. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे गोपीचंद पडळकर यांना बाबर गटाला पाठींबा द्यावा लागला होता. पडळकर यांनी बाबर यांना पाठींबा दिल्याने त्यांचा विजय झाला होता. परंतु आता खानापूर मतदार संघामध्ये बरेच वारे उलटे वाहू लागले आहेत. मतदार संघामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. तर ब्रम्हानंद पडळकर यांनीही जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना, मतदार संघामध्ये विकासामची अनेक कामे मार्गी लावली आहेत.
सध्या मतदार संघामध्ये अनेकांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. स्वप्न पहाणे गैर नाही, परंतु रात्रीच्या अंधारात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाय धरायला कोण येणार असेल तर ते त्यांनी फक्त स्वप्न बघावे. कारण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे परिणाम सध्या पडळकर गटाला मोजावे लागले असून, येथून पुढच्या काळात जर रात्रीचे पाय धरायला आले तरी कोणालाच शब्द देऊ नका असे साकडे आम्ही आमदार गोपीचंद पडळकर यांना घालणार असल्याचे जयवंत सरगर म्हणाले आहेत. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये खानापूर मतदार संघाचे आमदार म्हणून ब्रम्हदेव पडळकर यांना करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले असल्याचे त्यांनी सांगितले.