
माणदेश एक्सप्रेस न्युज/आटपाडी : राज्यामध्ये नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे. यामध्ये सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील काही भागांचा मिळून ‘माणदेश जिल्हा’ निर्मितीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. नवीन माणदेश जिल्हा निर्मिती करताना जिल्ह्याचे ठिकाण हे ‘आटपाडी’ येथे करावे अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी केली आहे. आटपाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही मागणी केली असून, याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन ही दिले आहे.
यावेळी बोलताना अनिल पाटील, माणदेश जिल्हा विभागासाठी आटपाडी शहर एक योग्य प्रशासकीय ठिकाण ठरू शकते. माणदेश हा सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या काही भागांचा समावेश असलेल्या प्रदेशाला संबोधले जाते, ज्यामध्ये आटपाडी, खानापूर, जत, कडेगाव, माण, खटाव इत्यादी तालुके येतात.
आटपाडीचे स्थान माणदेश भागाच्या मध्यवर्ती असून, येथून इतर तालुक्यांपर्यंत पोहोचणे सोपे आहे. आटपाडीला चांगला रस्ता संपर्क आहे, आणि भविष्यात रेल्वे किंवा इतर दळणवळणाच्या सुविधा विकसित करण्यास सोयीचे ठिकाण ठरू शकते. जिल्हा मुख्यालयासाठी आवश्यक प्रशासकीय सुविधा विकसित करण्यासाठी आटपाडीमध्ये जागा आणि साधनसामग्री सहज उपलब्ध होऊ शकते. तसेच माणदेश भागातील सांस्कृतिक, ऐतिहासिक, व सामाजिक महत्त्व लक्षात घेता, आटपाडी जिल्ह्याचे केंद्र होण्यासाठी योग्य मानले जाते. त्यामुळे शासनाने माणदेश जिल्ह्याचे ठिकाण हे आटपाडी येथे करण्याची मागणी अनिल पाटील यांनी केली आहे.