
माणदेश एक्सप्रेस न्युज/पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वादग्रस्त विधान करून संतापाचं केंद्र ठरलेले वकील विपुल दुशिंग हे स्वतःच एका मारहाणीच्या गुन्ह्यात आरोपी असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे!
१६ मे रोजी वैष्णवी हगवणेनं सासरच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं. तिच्या मृत्यूनंतर राज्यभर संताप उसळला. पोलिसांनी तिचा नवरा, सासू, सासरे, नणंद आणि दीराला अटक केली असून सध्या सर्वांची पोलीस कोठडी सुरू आहे.
मात्र, न्यायालयात आरोपींची बाजू मांडणाऱ्या वकील विपुल दुशिंग यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरच बोट ठेवत खालच्या पातळीवर आरोप केल्याने संतापाची लाट उसळली. “वैष्णवी दुसऱ्याच व्यक्तीसोबत चॅट करत होती” असा दावा त्यांनी न्यायालयात केला. एवढंच नाही, तर “नवऱ्याने मारहाण करणं ही कौटुंबिक हिंसाचारात मोडत नाही” असं बिनबुडाचं विधान करत त्यांनी कायद्यालाच काळिमा फासला.
या सगळ्या पार्श्वभूमीवर दुशिंग यांच्याच विरोधात २०२२ मध्ये एक गंभीर गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं आहे. वडगाव मावळ कोर्टात प्रेम कुमार अग्रवाल या वकिलाला मारहाण केल्याप्रकरणी विपुल दुशिंग आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता!
विपुल दुशिंग यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “जो त्या वकिलाच्या कानशिलात लगावेल त्याचा मी सत्कार करेन,” असं थेट आव्हान त्यांनी ट्विटरवरून दिलं आहे.