
वाहतूक कोंडी ही सध्या मोठी समस्या झाली आहे. दिवसें दिवस खासगी वाहनांची संख्या वाढत आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या आणखीच बिकट होत चालली आहे. गेल्या वर्षात सर्वांत जास्त वाहतूक कोंडी असलेल्या जगभरातील शहरात पुण्याचा सातवा क्रमांक लागला आहे. पुणेकरांना केवळ १० किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी २०२३ मध्ये सरासरी २७ मिनिटे ५० सेंकदांचा वेळ लागला. अशातच वाहतूक कोंडीतील थक्क करणारा व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बैलगाडी चालवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तो ज्या पद्धतीने बैलगाडी चालवतो आहे ते पाहून नेटकरी चक्रावले आहे.
तास न तास कोंडीमध्ये अडकल्याने सर्व चालक हैराण आहे. सकाळी लवकर निघा किंवा रात्री उशीरा बाहेर पडा….कोणत्याही वेळी बाहेर पडले तरी वाहतूक कोंडीतून सुटका मिळत नाही. दुचाकी चालक काही ना काही करून कोंडीतून बाहेर पडतात पण कोंडी सुटल्याशिवाय कार चालकांना सुटका मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये कारमध्ये एकाच जागी बसून किंवा बाईकवर बसून चालक वैतागतात. अशाच एका वाहतूक कोंडीमध्ये एक बैलगाडी चालक त्याच्या गाडीवर आरामात झोपलेला दिसत आहे. त्याला वाहतूक कोंडीत अडकल्याचे दुख नाही, कुठे पोहचण्याची घाई झालेली दिसत नाही. आपल्या विश्वासू बैलावर त्याने बैलगाडीचे नियंत्रण सोडले आहे आणि आरामात आपल्या गाडीवर डोक्याला हाताचा आधार देऊन झोपलेला दिसत आहे. सर्वात सुखी वाहनचालकाला पाहून पाहून अनेक वाहनचालकांना त्याचा हेवा वाटतो आहे.
व्हिडिओवर कमेंट करत होते,”गो ग्रीन, नो चार्जिंग, नो पोल्युशन”
दुसऱ्याने कमेंट केली,”भारतात उपयुक्त ठरेल अशी एकमेव ऑटो पायटल चार चाकी”
तिसऱ्याने कमेंट केली की, “नो हॉर्न, फक्त चला सर्जा”