18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन उद्यापासून सुरू ,पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नवनिर्वाचित खासदार घेतील शपथ

0
13

18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. लोकसभेचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरू होईल. सोमवारी लोकसभा अधिवेशना दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नवनिर्वाचित खासदार शपथ घेतील. प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब त्यांना शपथ देतील. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांची निवड होईल. तसेच दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संबोधित करतील.

पीएम मोदींच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये 58 लोकसभेचे सदस्य आहेत. केंद्रीय मंत्रिपरिषदेचे 13 सदस्य राज्यसभेचे खासदार आहेत आणि एक मंत्री, रवनीत सिंग बिट्टू हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. लुधियानामधून त्यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. पीएम मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांनंतर राज्यनिहाय खासदारांना शपथ दिली जाईल. संसदेच्या या अधिवेशनात शून्य तास आणि प्रश्नोत्तराचा तास असणार नाही.
27 जून रोजी होणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण –

24 जून रोजी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 280 नवनिर्वाचित खासदार शपथ घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 जून रोजी 264 नवनिर्वाचित खासदार शपथ घेतील. त्यानंतर 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. 27 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. 28 जून रोजी, सरकार राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करेल.

2 जुलै रोजी पंतप्रधान मोदी लोकसभेला संबोधित करणार –

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 जुलै रोजी लोकसभेला संबोधित करणार आहेत. ते 3 जुलै रोजी राज्यसभेत बोलणार आहेत. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी 20 जून रोजी सांगितले होते की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कटक, ओडिशा येथील भाजप खासदार भर्त्रीहरी महताब यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय, राष्ट्रपातींनी सुरेश कोडीकुन्नील, थालिकोट्टाई राजुतेवार बाळू, राधा मोहन सिंग, फग्गन सिंग कुलस्ते आणि सुदीप बंदोपाध्याय यांना अध्यक्ष निवडीपर्यंत प्रो टेम स्पीकरला मदत करण्यासाठी नियुक्त केले आहे.
संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच लोकसभेत भाजपला सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे, तर उपसभापतीपद एनडीएच्या मित्रपक्षांपैकी एकाला दिले जाऊ शकते. I.N.D.I.A. ब्लॉकने उपसभापती पदाची मागणी केली आहे, जे परंपरेने नेहमी विरोधकांकडे जाते. मात्र, 17 व्या लोकसभेत एकही उपसभापती नव्हता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here