माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी वनपरिक्षेत्रातील रोपवान व मृद जलसंधारणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीतील दोषी वनपाल अस्मिता पाटील यांचा बचाव करण्यासाठी वनविभागाचे सहा. वनसंरक्षकच आघाडीवर आहेत. आम्ही केलेल्या तक्रारीनंतर वृत्तपत्रातुन स्वतः खुलासा करणारे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारीच चौकशीचा फार्स करून दोषींना क्लिनचिट देत आहेत, असा गंभीर आरोप तक्रारदार मनोज नांगरे व महादेव जुगदर यांनी पत्रकार परिषदेत केला.
आटपाडी तालुक्यात वनविभागाने मोठ्या प्रमाणात घोटाळे केले असुन त्यावर युवा सेनेचे तालुकाप्रमुख मनोज नांगरे, जांभुळणीचे माजी सरपंच महादेव जुगदर यांनी वनमंत्री, जिल्हाधिकारी, वनविभागाच्या वरिष्ठांकडे पुराव्यांसह तक्रारी केल्या होत्या. त्यामध्ये आटपाडी वनविभागाचे अधिकारी अशोक खाडे, वनपाल अस्मिता पाटील हे दोषी असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.
या तक्रारीनंतर उपजिल्हाधिकारी-रोहयो यांच्याकडे चौकशीची सुनावणीची नोटीस काढण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा वस्तुनिष्ट अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याच्या सुचना यानिमित्ताने करण्यात आल्या. त्यानंतर वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अजित साजने यांनी तक्रारीच्या अनुषंगाने सुनावणीसाठी तक्रारदारांना पत्र काढले आहे. आणि हे पत्रच संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा दावा मनोज नांगरे, महादेव जुगदर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
मृद व जलसंधारणाची कामे प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोणतीही टेंडर प्रक्रिया न राबवता कार्यारंभ आदेश वनविभागाने दिला. अनेक गावातील वनक्षेत्रात कामे न करता, ५०टक्के पेक्षा अधिक रोपे जळालेली असताना ती जिवंत असल्याचे दाखवुन पैसे काढणे, रोपे न लावता पैसे काढले असे प्रकार घडले आहेत. त्याबाबत तक्रारी केल्यानंतर, त्याच्या बातम्या वृत्तपत्रातुन प्रसिध्द झाल्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी अजित साजने यांनी स्वतःहुन आटपाडी वनक्षेत्रातील कामे उत्कृष्ट असल्याचे प्रशस्तीपत्रक खुलासावजा वृत्तपत्रातुन दिले.
मुळात लोकांच्या तक्रारी आल्यानंतर त्याची दखल घेवुन वस्तुस्थिती जाणुन कार्यवाही करणे वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. परंतु त्याकडे कानाडोळा करून सहाय्यक वनसंरक्षक अधिकाऱ्यांनी वनविभागातील घोटाळ्यावर पडदा टाकण्यासाठी पुढाकार घेतला. दोषी वनपाल अस्मिता पाटील यांना वाचविण्यासाठीच तक्रारीनंतर, त्याच्या बातम्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक अधिकाऱ्यांनी खुलासा केला. आणि तेच आत्ता बातम्या आणि तक्रारीच्या चौकशीसाठी पत्र काढत आहेत, हाच सर्वात मोठा विनोद असल्याची टीकाही तक्रारदार युवा सेनाप्रमुख मनोज नांगरे, महादेव जुगदर यांनी केली.
वनविभागातील घोटाळे, भ्रष्टाचाराबाबत ज्यांनी स्वतः खुलासा केला तेच तव जरीच्या अनुषंगाने चौकशी कशी करतील, याचेच कोडे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आत्ता आटपाडीचे अशोक खाडे, वनपाल अस्मिता पाटील यांच्यासह सहाय्यक वनसंरक्षक अजित साजने यांचीही चौकशी करावी, अशी मागणीही मनोज नांगरे, महादेव जुगदर यांनी केली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.