प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ ठप्प

0
49

माणदेश एक्सप्रेस न्युज/मुंबई :अकरावी प्रवेशाच्या प्रत्यक्ष अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला बुधवारी सकाळी सुरुवात झाली, मात्र प्रवेशाचे संकेतस्थळच ठप्प असल्याने विद्यार्थी व पालकांचा गोंधळ उडाला. या संदर्भात शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता संकेतस्थळाचे काम सुरू असून लवकरच संकेतस्थळ सुरळीत होईल, असे सांगण्यात आले.

 

राज्यात यंदा दहावीच्या परीक्षेत १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावी प्रवेशासाठी राज्यामध्ये तब्बल २० लाख ९१ हजार ३९० जागा आहेत. या जागांसाठी २१ मे रोजीपासून प्रवेश प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे. यंदा प्रथमच संपूर्ण राज्यामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यापूर्वी मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका, छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, यांसारख्या काही ठराविक महानगरपालिकांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत होती.

 

मात्र यंदापासून राज्यभर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्यभरातील प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडण्याबाबत शिक्षण तज्ज्ञांकडून शंका उपस्थित करण्यात येत होती. त्याची प्रचिती प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी आली आहे. बुधवारी सकाळी अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेशअर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ सुरू केले. मात्र संकेतस्थळ ठप्प असल्याचे आढळून येत होते. संकेतस्थळावर सुरुवातीला ‘५०२ बॅड गेटवे’ असा संदेश येत होता. त्यानंतर दुपारी संकेतस्थळावर ‘संकेतस्थळाचे काम सुरू’ असा संदेश येत होता. त्यामुळे सकाळपासून सायबर कॅफे किंवा घरातील संगणकासमोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

 

संकेतस्थळावर देण्यात आलेल्या मदत क्रमांकावर (हेल्पलाईन) पालक व विद्यार्थी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र बहुतेकांचा संपर्क झालाच नाही. कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे नेमके काय झाले आहे, याची काहीच कल्पना पालक व विद्यार्थ्यांना येत नसल्याने काय करावे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. संकेतस्थळाचे थोडे तांत्रिक काम सुरू असल्याने ते बंद ठेवण्यात आली आहे. हे काम लवकरच पूर्ण होऊन संकेतस्थळ सुरू करण्यात येईल.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here