ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलाविरोधात गुन्हा दाखल,काय आहे नेमक प्रकरण?

0
228

आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव  यांच्यावर तीन वर्षांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता. आता या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर  यांचा मुलगा दीपक बडगुजर  यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तीन वर्षांपूर्वी आरपीआयचे नाशिक महानगरप्रमुख प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात प्रशांत जाधव हे गंभीर जखमी झाले होते. या गोळीबार प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे.

दीपक बडगुजरांवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आता तीन वर्षानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर यांच्या सांगण्यावरून गोळीबार झाल्याचा पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दीपक बडगुजरांवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

राजकीय हेतूने कारवाई : सुधाकर बडगुजर
मुलावर गुन्हा दाखल झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. ते म्हणाले की, पोलीस प्रशासनाकडून ताब्यात घेतलेल्यांना मारहाण करण्यात येत होती. सुधाकर बडगुजर आणि दीपक बडगुजर यांचे नाव घेण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांना मारहाण केली. जुने नाव घेतले त्यांची सखोल चौकशी करा. राजकीय हेतूने ही कारवाई केली जात आहे. मात्र, न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातही आम्हाला त्रास देण्याचे काम केले. पवननगर येथे झालेल्या गोळीबारात अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. अंबड पोलिसांच्या कामकाजावर मला संशय वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

संजय राऊतांचा गंभीर आरोप
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबीयांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी नाशिक पोलीस आणत असल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रात शिवसेनेचे वातावरण पाहता अनेक ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहे. काल मी नाशिकला होतो. नाशिकला माझ्या लक्षात आलं की, आमचे सुधाकर बडगुजर हे निवडणूक लढवत असल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पुन्हा एकदा खोट्या प्रकरणात गुंतवण्यासाठी तीन वर्षांपूर्वीची केस उकरून काढली आहे. कोणावर तरी गोळीबार झाला होता असे म्हणतात. त्यातील आरोपींना पकडून त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्या तोंडून बडगुजर कुटुंबीयांचं नाव घेण्यासाठी नाशिकचे पोलीस दबाव आणत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here