
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली / प्रतिनिधी : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या विषयी केलेल्या वक्त्यावाच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन सांगलीत रविवारी करण्यात आले. यावेळी कृषी मंत्री कोकाटे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्याचा सात बारा कोरा केला जाईल असे आश्वासन महायुतीने दिले होते. मात्र सत्तेवर आल्यावर मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा धंदा सुरु आहे. प्रथम अजितदादानी कर्ज माफी करता येणार नाही असे घोषित केले. त्यावर कडी करत कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांची कर्ज माफी केली तर शेतकरी उधळ पट्टी करतात, लग्ने आणि साखर पुड्यावर पैसे उधळतात त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज माफी कशाला हवी आहे असे म्हणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पण या पुढच्या काळात कर्जमाफी साठी रस्त्यावरची लढाई आम्ही लढत राहू असा इशारा खराडे यांनी दिला. यावेळी महेश खराडे, भागवत जाधव, प्रकाश देसाई, शिवाजी पाटील, रज्जाक मुलाणी, उत्तम पाटील, दत्ताजी पाटील, साहेबराव पाटील, रामभाऊ जाधव, अनिल गावडे, शंकर पाटील, प्रदीप पाटील, रविकिरण माने, आकाश साळुंखे आदिसह अन्य उपस्थित होते.