
माणदेश एक्सप्रेस न्युज|नाशिक : शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेते सुधाकर बडगुजर यांनी काल नाराजी व्यक्त करत मनातील खदखद बोलून दाखवली होती. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर आज त्यांची पक्षातून थेट हकालपट्टी करण्यात आल्याने मोठी खळबळ माजली आहे. सुधाकर बडगुजर यांच्यावर पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला. पक्षाच्या या कारवाईनंतर आता सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
पक्षामध्ये उघडपणे नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे. आणि जर त्या गुन्ह्याच्या शिक्षेचं हकालपट्टीमध्ये रुपांतर होत असेल तर त्याचं उत्तर मी काय देणार ? असा सवालच बडगुजर यांनी विचारला आहे. पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता, मात्र मी पक्षाविरुद्ध कोणंतही वक्तव्य केलेलं नाही असं बडगुजर यांनी स्पष्ट केलं. असं कोणंतही वक्तव्य मी केलं असेल तर ते मीडियाच्या माध्यमातून पुढे आणावं असं आव्हानही त्यांनी दिलं. पण संघटनात्मक बदल झाले तेव्हा नाराजी व्यक्त केली, काल उघडपणे बोलून दाखवलं, तो जर गुन्हा असेल तर तो मी केलाय असा पुनरुच्चार त्यांनी केला. त्याची शिक्षा जर हकालपट्टी असेल तर ती मला मान्य आहे, असंही बडगुजर म्हणाले.
यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधणार आहात का, संवाद साधणार का असा सवाल बडगुजर यांना विचारण्यात आला असता त्यांनी थेट उत्तर दिलं. हकालपट्टीनंतर कोणता संवाद साधणार ? न्यायलयातसुद्धा एकतर्फी निर्णय होत नसतो, दोन्ही बाजू ऐकल्यानंतर निर्णय दिला जातो असं म्हणत त्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. शिवसेना कार्यालयात आजा काही नियोजित प्रवेश होते, पण काहीव वैयक्तिक कार्यक्रमामुळे मी बाहेर आहे, त्यामुळे पक्ष कार्यालयात जाऊ शकलो नाही, असे ते म्हणाले.
नाशिकमधील मोठे नेते असलेले सुधाकर बडगुजर यांनी, आपण पक्षात नाराज आहोत, असे काल सांगितलं होतं. त्यानी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. केवळ मीच नव्हे तर पक्षात आणखी 10 ते 12 जण नाराज आहेत. मात्र आपली नाराजी संजय राऊत यांच्यावर नसल्याचे स्पष्ट करत पक्ष संघटनेत बदल करताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही म्हणून नाराज आहे, महानगरप्रमुख विलास शिंदे देखील नाराज आहेत असं सुधाकर बडगुजर काल म्हणाले होते. त्यामुळे मोठी खळबळ माजली होती, शिवेसेनेत मोठा भूकंप होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यातच आज बडगुजर यांची शिवसेना उद्धव ठाकरे गटातून हकालपट्टी केल्याचे जाहीर करण्यात आलं.