२५ ऑगस्ट रोजी सांगली कडकडीत बंद, ‘हे’ आहे कारण

0
878

 

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना आता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी यावर भाष्य केले आहे. बांगलादेशमध्ये हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून सांगली जिल्ह्यात २५ ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पुकारला जाणार असल्याची माहिती देण्यासाठी संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी कोलकाता बलात्कार प्रकरणापासून ते राज्यातील विविध प्रश्नांना हात घालत रोखठोक भाष्य केले.

यावेळी मराठा आरक्षणासंदर्भातही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर संभाजी भिडे म्हणाले की, मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. याचे उदाहरण देताना त्यांनी सांगलीतील कमांडो ट्रेनिंग कॅम्पचा उल्लेख केला. या ट्रेनिंग कॅम्पमध्ये निःशुल्क प्रवेश दिला तर वाघ आणि सिंहानी तिथे प्रवेश घ्यावा का? विमान उडविण्याच्या प्रशिक्षणासाठी गरुडाने प्रवेश घ्यावा का? स्विमिंग क्लबमध्ये मासळी प्रवेश घेईल का? अशाच पद्धतीने मराठ्यांनी आरक्षण मागावे का? हा प्रश्न संभाजी भिडे यांनी उपस्थित केला.

“मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठे मागता? सिंहानी जंगल सांभाळायचे असते. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालविणारी जात आहे, हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्यादिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल. हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे आपले दुर्दैव आहे”, असेही संभाजी भिडे यांनी सांगितले.

२५ ऑगस्ट रोजी सांगलीत कडकडीत बंद
बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर २५ ऑगस्ट रोजी संबंध सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी भिडे यांनी केली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे हा बंद पुकारण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच बांगलादेशमध्ये जो अत्याचार सुरू आहे, त्याविरोधात भारत सरकारने कडक पाऊले उचलावीत, अशीही मागणी त्यांनी केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here