…म्हणून ब्रेकफास्टला पोहे खाणे ठरते फायद्याचे

0
361

वाढलेले वजन कमी करण्यासाठी हे खाऊ नका ते खाऊ नका कायम सांगितले जाते. मात्र काय खाणे चांगले हे मात्र समजत नाही. त्यामुळे वाढलेले वजन कमी करणे हे लठ्ठ लोकांसमोरचे आव्हान बनते. वजन वाढण्याची अनेक कारणे असतील तरी आहार हे त्यातील एक सामान्य कारण आहे. लठ्ठपणामुळे हृदयाच्या तक्रारी, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या समस्या निर्माण होण्यास सुरुवात होते. पण एखाद्या सोप्या उपायानेही वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. ब्रेकफास्टला काय करावे असा प्रश्न उपस्थित झाला किंवा अचानक कोणी पाहुणे आले की पोहे हा महाराष्ट्रातील ठरलेला पदार्थ आहे. बनवायला सोपे आणि चविष्ट अशी ही पाककृती त्यामुळेच प्रसिद्ध आहे. पण वजन कमी होण्यासही पोहे उपयुक्त असतात हे आपल्यातील अनेकांना माहित नसेल. पोह्यामध्ये असणारे कार्बोहायड्रेटस, प्रोटीन, फायबर, व्हीटॅमिन्स आणि आयर्न यामुळे पोहे खाणे हा वजन घटविण्यासाठी उत्तम उपाय ठरु शकतो. हे सर्व घटक केवळ वजन कमी करण्यासाठीच उपयुक्त ठरतात असे नाही तर शरीराला आवश्यक असणारे बरेच फायदे त्यातून मिळतात. मात्र पोह्यामध्ये बटाटा घातल्यास त्यातील कॅलरी मूल्य वाढत असल्याने ते टाळावे.

आरोग्यदायी कार्बोहायड्रेट

पोह्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळण्यास मदत होते. पोह्यात ७६.९ टक्के कार्बोहायड्रेट आणि २३ टक्के चरबीयुक्त पदार्थ असतात. त्यामुळे तुम्ही ब्रेकफास्टला पोहे खात असाल तर तुमचे वजन कमी होण्यास त्याचा उपयोग होतो आणि तुमच्या शरीरावर अनावश्यक चरबी वाढत नाही.

पचनक्रिया सुधारते

खाल्लेल्या अन्नाचे पचन होणे आवश्यक असते. पोहे हे सहज पचतात आणि पचनशक्ती वाढविण्यासही मदत करतात. खाल्लेल्या अन्नाचे चांगल्या पद्धतीने पचन झाल्यास वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

फायबर ठरतात फायद्याचे

पोह्यामध्ये असणाऱ्या फायबर या घटकामुळे शरीरातील जास्तीची चरबी घटण्यास मदत होते. तसेच पोहे खाल्ल्याने दिर्घकाळ पोट भरलेले राहते आणि सतत भूक लागत नाही. त्यामुळे नकळत आपण प्रमाणामध्ये खातो आणि वजन वाढीवर नियंत्रण येण्यास मदत होते.

रक्तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात राहण्यास मदत

फायबर आणि आयर्न या घटकांमुळे रक्तातील साखर वाढण्यास अटकाव होतो. तसेच शरीरातील साखरेची पातळी वाढण्यावरही या घटकांमुळे नियंत्रण येते. त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

काही प्रमाणात कॅलरीज

पोह्यात असणाऱ्या कॅलरीजमुळे वजन वाढण्याची चिंता नसते. पोह्यात २५० कॅलरीज, व्हीटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. याबरोबरच यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंटसही फॅटस जळण्यास उपयुक्त ठरतात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here