
Pahalgam Terror Attack : लग्नानंतर दोन महिन्यांत शुभमला दहशतवाद्यांनी केलं ठार, मृतदेहासमोर बसून पत्नीचा मूक टाहो जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या हल्ल्यात २६ पर्यटक ठार झाले आहेत. लोकांना धर्म विचारुन त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. याच या हल्ल्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. याच हल्ल्यात एक पत्नी आपल्या पतीच्या मृतदेहासमोर बसून मूक आक्रोश करते आहे हा फोटो समोर आला आहे.
काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात प्रत्यक्षदर्शींचे फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. दरम्यान एक हृदय पिळवटून टाकणारा फोटो समोर आला आहे. एक नवविवाहिता मधुचंद्रासाठी पहलगाम या ठिकाणी गेली होती. तिचा नवरा गोळीबारात ठार झाला आहे. त्याच्या मृतदेहाजवळ ती स्तब्ध बसून आहे. तिचा हा मूक आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा ठरला आहे. हा फोटो पाहून प्रत्येकाच्याच काळजात धस्स होतं आहे. शुभम द्विवेदी यांच्या पत्नीचा हा फोटो आहे. इशान्या असं तिचं नाव आहे. या दोघांचंही लग्न दोन महिन्यांपूर्वी झालं होतं.
शुभम आणि त्याच्या पत्नीने दुपारी १ च्या सुमारास हॉटेल सोडलं. त्यानंतर ते घोडेस्वारीसाठी गेले होते. त्यांच्याबरोबरचे कुटुंबीय हॉटेलमध्ये थांबले होते. शुभम आणि त्याची पत्नी फिरायला गेले असतानाच दहशतवाद्यांनी शुभमला गोळ्या झाडून ठार केलं. इश्याना असं शुभमच्या पत्नीचं नाव आहे. शुभमला तिच्या डोळ्यांदेखतच दहशतवाद्यांनी ठार केलं. शुभमचा भाऊ मनोज याने ही माहिती दिली आहे. शुभमचा चुलत भाऊ सौरभ याने ही माहिती दिली की शुभम आणि इशान्या यांचं लग्न १३ फेब्रुवारीला झालं होतं. दोघंही काश्मीरमध्ये कुटुंबीयांसह फिरायला गेले होते. त्याचवेळी ही घटना घडली.
शुभम द्विवेदीचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबाला समजली. ज्यानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आमच्या मुलाला म्हणजेच शुभमला ज्या क्रूर पद्धतीने मारण्यात आलं तसंच इतर लोकांनाही ठार करण्यात आलं. सरकारने या हल्लेखोरांचा बदला घ्यायला हवा, तसंच शुभमचा मृतदेह लवकरात लवकर आमच्या घरी पाठवावा अशी मागणी शुभमच्या कुटुंबीयांनी केली आहे. आमच्या कुटुंबातले १० जण पहलगाममध्ये आहेत. बुधवारी काही लोक दिल्लीत येतील. आम्हाला शुभमचा मृतदेह लवकरात लवकर पाठवला जाईल अशी अपेक्षा आहे.