नाशिक शहराच्या पाठोपाठ धुळे शहरात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. शहरातील प्रमोद नगर भागात राहणाऱ्या गिरासे कुटुंबातील आई-वडिलांसह दोन मुलांनी आत्महत्या (Suicide News) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे धुळे (Dhule News) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आत्महत्या मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कुटुंबाचे प्रमुख असणारे प्रवीण गिरासे यांचे फर्टिलायझरचे दुकान असून पत्नी आणि दोन मुलांसमवेत ते प्रमोद नगर येथे वास्तव्यास होते. मंगळवारी आपण मुलाच्या ॲडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी परिसरातील नागरिकांना सांगितले होते. मात्र, मंगळवारपासून घराचा दरवाजा बंद असल्याचे नागरिकांना दिसत होते. प्रवीण गिरासे यांची बहीण या आज सकाळच्या सुमारास त्यांना भेटण्यासाठी घरी आल्यानंतर घराचा दरवाजा वरच्यावर लावण्यात आला होता. तो त्यांनी उघडला असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार समजल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
या चौघांनी विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे धुळ्यातील समर्थ कॉलनीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आई-वडिलांनी सोन्यासारख्या दोन लेकरांसह आत्महत्या का केली असावी, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पोलीस तपासातून या सगळ्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
मृतांची नावे
प्रवीण मानसिंग गिरासे
दीपा प्रवीण गिरासे
मितेश प्रवीण गिरासे
सोहम प्रवीण गिरासे
नाशिकमध्ये बॉश कंपनीच्या कर्मचाऱ्याची कुटुंबासह आत्महत्या
नाशिकमधील गौळने गावातील बॉश कंपनीत काम करणाऱ्या विजय सहाने यांनी आपल्या कुटुंबासोबत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी उघडकीस आली होती. विजय सहाने हे गेल्या बारा वर्षांपासून बॉश कंपनीत कामाला होते. त्यांनी आपली पत्नी आणि नऊ वर्षाच्या मुलीसोबत आत्महत्या केली. विजयच्या कुटुंबीयांनी बॉश कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विजय सहाने अस्वस्थ होते. याच तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगत कुटुंबीयांनी यासाठी बॉश कंपनीला जबाबदार धरले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. मात्र, अद्याप बॉश कंपनीकडून याबाबत कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.