माणदेशएक्स्प्रेस/पुणे : व्यक्तीकेंद्रीत पक्ष असलेली शिवसेना की राष्ट्रकेंद्रीत असलेला भारतीय जनता पक्ष यामध्ये आम्ही राष्ट्रकेंद्रीत पक्षाची निवड केली असे स्पष्ट करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या उद्धवसेनेच्या ५ माजी नगरसेवकांनी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच असल्याचे सांगितले.
उद्धव ठकारे सेनेतील विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, संगीता ठोसर व प्राची आल्हाट या ५ माजी नगरसेवकांनी नुकताच भाजपत प्रवेश केला. त्यानंतर भाजप कार्यालयात झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला.
आमच्या पूर्वीच्या पक्षावर आम्ही कधीच टीका करणार नाही, मात्र त्यांची भूमिका पटली नाही, त्यामुळे पक्षबदल केला असे या नगरसेवकांनी स्पष्ट केले. बाळा ओसवाल म्हणाले, २५ वर्षे आम्ही शिवसेनेत होतो. हिंदुत्वाविषयी मी प्रथमपासून आग्रही आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसबरोबर युती केली त्यावेळीच आम्हाला पटले नव्हते.
हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पर्याय का निवडला नाही यावर बोलताना ओसवाल व धनवडे यांनी व्यक्तीकेंद्रीत पक्ष की राष्ट्रकेंद्रीत पक्ष यात आम्ही भाजपची निवड केली असे सांगितले. भाजपचा नारा राष्ट्र प्रथम असा आहे, आता महापालिकेची उमेदवारी मिळाली नाही तर मग काय करणार? या प्रश्नावर या ५ नगरसेवकांनी आम्ही पक्षादेश प्रमाण मानणारेच आहोत, शिवसेनेत होतो त्यावेळीही तेच केले व आताही तेच करू असे सांगितले.