
माणदेश एक्सप्रेस/पुणे : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती येथील कार्यक्रमानंतर पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर येणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला हे दोघे नेते उपस्थित राहणार आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या दोघांची एकाच कार्यक्रमाला उपस्थिती चर्चेची ठरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार कुटुंबीयातील संघर्ष टोकाला पोहोचला होता. पक्षफुटीनंतर पवार कुटुंबीयातही फूट पडली होती. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेले यश आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी मिळविलेल्या यशानंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील, या चर्चेने जोर धरला होता. त्यानंतर बारामती येथील एका कार्यक्रमावेळी ‘ताटात पडले काय किंवा वाटीत पडले काय,’ असे सांगत अजित पवार यांनी एकत्र येण्याबाबतचा संभ्रम कायम ठेवला होता. त्यानंतर बारामती येथे गेल्या आठवड्यात झालेल्या कृषिक प्रदर्शनाच्या निमित्ताने पवार कुटुंबीय एकत्र आले होते.