
माणदेश एक्सप्रेस न्यूज|पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये संभाव्य ऐक्याबाबतच्या चर्चांना पुन्हा बळ मिळाले आहे. रविवारी पुण्यातील साखर संकुल येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेली बैठक विशेष ठरली. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बंद दरवाजाआड सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही उपस्थित होते, असे सांगितले जात आहे.
संध्याकाळी दोनच्या सुमारास सुरू झालेल्या या बैठकीस एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानासंदर्भातील मुद्दे चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. बैठकीस राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील आदी नेतेही उपस्थित होते. मात्र, सर्व नेते बाहेर पडल्यानंतर केवळ शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील हेच बैठकीच्या खोलीत थांबले.
दरम्यान, जयंत पाटील यांनी मात्र एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत तिघांमध्ये अशी कोणतीही स्वतंत्र बैठक झाल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. त्यामुळे या भेटीच्या पार्श्वभूमीवर विविध तर्क-वितर्कांना आणि चर्चांना उधाण आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, गेल्या ५५ दिवसांत शरद पवार आणि अजित पवार यांची ही पाचवी भेट आहे. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याचा मार्ग मोकळा होतोय का? यावर राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.