अजुन विरोधकांच्या सात खासदारांचा शपथविधी बाकी; लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार?

0
2

विरोधकांना लोकसभेचे उपाध्यक्ष पद न दिल्यामुळे इंडिया आघाडीने अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आज संसदेच्या अधिवेशनाचा तिसरा दिवस असून अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकते. पंतप्रधान मोदी सकाळी ११ वाजता अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडतील. त्यानंतर १९७६ नंतर पहिल्यांदाच अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. भाजपाप्रणीत एनडीएकडून ओम बिर्ला तर विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून के. सुरेश या पदासाठी निवडणुकीला उभे आहेत. के. सुरेश केरळमधील काँग्रेसचे खासदार असून ते आठवेळा निवडून आले आहेत.

खासदारांचे संख्याबळ पाहिले तर एनडीएची सहज सरशी होईल, हे दिसत आहे. विरोधकांकडे असलेल्या २३२ खासदारांपैकी पाच खासदारांनी अद्याप शपथ घेतलेली नाही. तर दोन अपक्षही शपथ घेण्यासाठी पोहोचलेले नाहीत. त्यामुळे त्यांना निवडणुकीत मतदान करता येणार नाही. यामध्ये काँग्रेसचे शशी थरूर आणि तृणमूल काँग्रेसच्या शत्रुघ्न सिन्हा अशा बड्या नेत्यांचाही समावेश आहे.

या दोन मोठ्या नेत्यांसह तृणमूल काँग्रेसच्या दीपक अधिकारी आणि नुरुल इस्लाम तर समाजवादी पक्षाच्या अफजल अन्सारी आणि दोन अपक्षांनी अद्याप खासदारकीची शपथ घेतलेली नाही. अफजल अन्सारी हे गुन्हेकार राजकारणी मुख्तार अन्सारी यांचे मोठे बंधू आहेत. अफजल अन्सारींना चार वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली आहे. मात्र निवडणूक असल्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. आता जुलै महिन्यात सुट्टयांनंतर जेव्हा न्यायालय सुरू होईल, तेव्हाच या प्रकरणाची सुनावणी होईल. जर अन्सारी यांच्या शिक्षेवरील स्थगिती उठवली गेली तर त्यांना आपली खासदारकी सोडावी लागू शकते.

इंडिया आघाडीचे संख्याबळ किती?
अध्यक्षपदाचा विजय हा किती खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदान केले, यावर ठरणार आहे. याचा अर्थ या सात खासदारांनी शपथ न घेतल्यामुळे विरोधकांचे संख्याबळ आताच कमी झाले आहे. विरोधकांनी २३२ जागांवर विजय मिळविला आहे. त्यापैकी पाच खासदारांनी शपथ न घेतल्यामुळे हे संख्याबळ सध्या २२७ इतके आहे. अनेक खासदारांनी शपथ न घेतल्यामुळे बहुमताची संख्या २६९ एवढी झाली आहे.

एनडीएकडे किती संख्याबळ?
एनडीएकडे २९३ खासदारांचे संख्याबळ आहे. तसेच आंध्रप्रदेशच्या जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसच्या चार खासदारांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. ओडिशामध्ये भाजपाने बिजू जनता दलाचा पराभव केल्यानंतर त्यांनी भाजपाला कोणताही पाठिंबा देणार नसल्याचे म्हटले आहे. आंध्रप्रदेशमध्ये एनडीएतील घटक पक्ष टीडीपीने जगनमोहन रेड्डी यांचा पराभव केल्यानंतरही त्यांनी भाजपाला पाठिंबा कायम ठेवला आहे.

विरोधकांच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी भाजपाकडे पुरेसे संख्याबळ आहे. याशिवाय अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल, नगिनाचे खासदार चंद्रशेखर आझाद, शिलाँगचे खासदार रिकी अँड्रू यांचाही पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाणार आहे. या निवडणुकीत जवळपास ३०० खासदारांचा पाठिंबा मिळवून विरोधकांवर एकप्रकारचा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न एनडीएकडून केला जात असल्याचे दिसत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here