सांगलीतील कवलापूर येथील तंटामुक्ती अध्यक्षावर कोयत्याने खुनीहल्ला; संशयिताला अटक

0
13

कवलापूर (ता. मिरज) येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व भाजपचे नेते भानुदास किसनराव पाटील (वय 42) यांच्यावर सोमवारी सायंकाळी कोयत्याने खुनीहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेेनंतर गावात तणावाची स्थिती असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एका हल्लेखोर संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.कवलापुरातील सिद्धेश्वर मंदिराजवळ रात्री साडेसात ते आठच्या सुमारास ही घटना घडली. पूर्वीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

भानुदास पाटील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. भाजपचे नेते, माजी ग्रामपंचायत सदस्य आणि सध्या ते ग्रामपंचायतीतील सत्ताधारी गटाचे नेते आहेत. रात्री चार संशयितांनी त्यांना घराबाहेर बोलाविले. सिद्धेश्वर मंदिराजवळ एकाने कोयत्याने त्यांच्या डोके, मान व पाठीवर हल्ला केला. हल्ल्यानंतर संशयित पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे, ग्रामीणचे निरीक्षक राजेश रामाघरे हे पथकासह घटनास्थळी आले. जखमी पाटील यांना तातडीने उपचारासाठी सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तातडीने एका संशयितास ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.