संजय राऊतांची टीका, “राज ठाकरेंचा वापर बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी केला गेला”

0
156

मुंबई : विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता महापालिका निवडणुकांकडे राजकीय पक्षांनी मोर्चा वळवल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, पुणे यांसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका कधीही लागू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा विचार ठाकरे गट करत असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असून, नेते, पदाधिकारी उघडपणे नाराजी व्यक्त करून पक्षाला जय महाराष्ट्र करत आहेत. ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी यांसह अनेक कार्यकर्ते भाजपा, शिवसेना शिंदे गटात जात आहेत.

 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना पक्ष फोडाफोडीबाबत भाष्य केले. शरद पवारांच्या पक्षाचे खासदार फुटत नाहीत, तोपर्यंत अजित पवारांच्या गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार नाही. हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवे आहे. पटेल यांना सांगितले गेले आहे की, खासदारांचा कोटा पूर्ण करा. शरद पवारांच्या गटाचे सहा ते सात खासदार फोडले की, तुम्हाला मंत्रिपद मिळेल.

 

राज ठाकरेंच्या मनसेचा वापर होतो आहे, तो वापर कुणाविरुद्ध होतो आहे, तर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात आणि महाराष्ट्राच्या विरोधात होतो आहे. हा वापर मराठी माणसांची संघटना फोडण्यासाठी होतो आहे एवढेच मी सांगेन, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या संपर्कात कोण आहेत? ती नावे जाहीर करावीत.