सांगली : लाचखोर अभियंत्याच्या बँक लॉकर मधून आढळले, तब्बल एक कोटी 50 लाख रुपये किमतीचे सोने व ११ लाख ८९ हजार रुपयांचो रोकड

0
14

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : 28 हजारांची लाच स्वीकारताना माजलगाव पाटबंधारे विभागाचा कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर (रा.भाग्यश्री अपार्टमेंट, कुपवाड रोड, मिशन हॉस्पिटल एरिया, मिरज) याला परळी येथे रंगेहाथ पकडण्यात आले होते. यानंतर त्याच्या मिरज येथे असलेल्या बँक लॉकरची बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी तपासणी केली. त्यामध्ये तब्बल एक कोटी 50 लाख रुपये किमतीचे दोन किलो 105 ग्रॅम वजनाचे सोने आणि 11 लाख 89 हजार रुपये रोकड आढळून आली.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोकड आणि ऐवज पाहून पथकही चक्रावले. मौजे चिंचोटी (जि. बीड) येथे तलावातील गाळ व माती शेतात टाकण्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी माजलगाव येथे कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंता सलगरकर याच्याकडे शेतकर्‍यांनी अर्ज केला होता. यानंतर परवानगी मिळवून देण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी पाच हजार प्रमाणे सातजणांकडून 35 हजार रुपये लाचेची मागणी सलगरकर याने शेतकर्‍यांकडे केली होती. तडजोडीअंती 28 हजार रुपयांची लाच मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारताना सलगरकर यास रंगेहाथ पकडण्यात आले होते.

यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड येथील पथकाने सलगरकर याच्या मिरज येथे कुपवाड रस्त्यावरील घराची झडती घेतली. यावेळी पथकाला युनियन बँक ऑफ इंडियाच्या मिरज शाखेत असलेल्या लॉकरची चावी सापडली होती. त्यानुसार पथकाने लॉकरची झडती शुक्रवारी घेतली. यामध्ये रोख 11 लाख 89 हजार रुपये, दोन किलो सोने यामध्ये 1114 ग्रॅम वजनाची 7 बिस्कीटे व 991 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत 1 कोटी 50 लाख) असा एकूण 1 कोटी 61 लाख 89 हजार रुपयांचा ऐवज आढळून आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक गुलाब बाचेवाड, हनुमान गोरे, अमोल खरसाडे, अंबादास पुरी यांच्या पथकाने केली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here