
माणदेश एक्स्प्रेस न्यूज|मुंबई : एस.टी. महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करून उत्पन्न वाढविण्यासाठी राज्यभर ‘धुळे-नंदुरबार पॅटर्न’ राबवला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. महामंडळाच्या उत्पन्नवाढीच्या उपाययोजनांबाबत आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
सरनाईक म्हणाले, “धुळे-नंदुरबार विभागाने ज्या पद्धतीने उत्पन्नवाढीसाठी प्रभावी पावले उचलली, ती संपूर्ण राज्यात लागू करणं गरजेचं आहे. ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव झाला आहे. त्यांचा अनुभव सर्वांपर्यंत पोहोचवला जावा.”
या बैठकीत पुढील महत्त्वाच्या उपाययोजना सुचवण्यात आल्या:
- गर्दी नसलेल्या वेळांतील फेऱ्यांचे पुनरावलोकन करून, उत्पन्नदृष्ट्या फायदेशीर मार्गांवर त्या वळवणे.
- जुनी बसेस बदलून इंधन कार्यक्षम नवीन बसेसचा वापर लवकर सुरू करणे.
- कार्यक्षम कर्मचाऱ्यांची योग्य पदावर नियुक्ती व प्रशिक्षणाचे आयोजन.
- स्थानिक प्रवासी मार्गांवर शटल फेऱ्या चालवणे.
- RTO सहकार्याने अवैध वाहतूक रोखून तेथे एस.टी. फेऱ्या वाढवणे.
- डिझेल टँकरचा दक्षतेने वापर करून इंधन चोरी रोखणे.
- दैनंदिन देखभाल वाढवून वाहनांचे प्रति किमी मायलेज सुधारण्यावर भर.
- जुने टायर बदलताना ट्युब आणि फ्लॅपही नवीन घालणे.
त्याचबरोबर, अनावश्यक खर्च टाळण्यासाठी अतिकालीन भत्त्यावर नियंत्रण, गर्दीच्या हंगामात अधिक कर्मचारी उपलब्ध ठेवणे, आणि आठवडे बाजार, यात्रा, जत्रा यावेळी जादा फेऱ्या सुरू करणे यावरही भर देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. “फक्त दोन-चार आगार उत्पन्नवाढीत पुढे असून चालणार नाही, तर सर्वच आगारांनी सामूहिक प्रयत्नातून एस.टी. महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवावं,” असं आवाहनही सरनाईक यांनी यावेळी केलं.