
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हिटमॅनने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती शेअर केली. रोहितने अचानक निवृत्ती घेतल्याने इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. आयपीएल 2025 नंतर, भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाईल. या काळात दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. ही कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ या मालिकेसह नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद चक्राची सुरुवात देखील करेल.
रोहितने इंस्टाग्रामवर लिहिले, ‘मला माझ्या सर्व चाहत्यांना सांगायचे आहे की आज मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. आपल्या देशासाठी सफेद रंगाच्या जर्सीत खेळणे आणि देशाचे प्रतिनिधित्व करणे हा बहुमान मला मिळाला. इतके वर्ष मला दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. मी एकदिवसीय फॉरमॅटमध्ये देशाचे नेतृत्व करत राहणार आहे’, असे हिटमॅनने शेअर केले आहे. त्याने कसोटी क्रिकेटसाठी वापरल्या जाणाऱ्या निळ्या रंगाच्या टोपीचा फोटो शेअर करत त्यावर हा मजकूर लिहला आहे.
मागच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती, त्यानंतर आता रोहितने टेस्ट क्रिकेटलाही अलविदा केले आहे, त्यामुळे हिटमॅन आता फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे.
रोहित शर्मा याने 6 नोव्हेंबर 2013 रोजी कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. रोहितने तेव्हापासून गेली 12 कसोटी संघांचे प्रतिनिधित्व केले. तसेच रोहितने या दरम्यान काही वर्ष भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली.
रोहितने 67 कसोटी सामन्यांमधील 116 डावांमध्ये 57.08 या स्ट्राईक रेटने आणि 40.58 च्या सरासरीने 4,302 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 88 षटकार आणि 473 चौकार लगावले. रोहितने 12 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत 18 अर्धशतकं, 12 शतकं आणि 1 द्विशतक झळकावले. रोहितची 212 ही कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे.
रोहितने 2022-2024 दरम्यान एकूण 24 सामन्यांमध्ये भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले. रोहितने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात 24 पैकी 12 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. तर 9 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. तर 3 सामने अनिर्णित राहिले. रोहितची कर्णधार म्हणून 57.14 अशी विजयी टक्केवारी राहिली.