नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी निर्माण झाली आहे, कारण आयडीबीआय बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना दर महिना तब्बल एक लाख ५७ हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. या पदासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. उमेदवार आयडीबीआय बँकेच्या idbibank.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
रिक्त पदे आणि तपशील
रिक्त पदे : एकूण ५६
आयडीबीआय बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. यात असिस्टंट जनरल मॅनेजर ग्रेड सीच्या २५ आणि मॅनेजर ग्रेड बीच्या ३१ पदांसाठी भरती जाहीर केली आहे, अशा एकूण ५६ जागा भरल्या जाणार आहेत.
यात जनरल कॅटेगरीतील उमेदवारांसाठी २५ जागा, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी १४ जागा, एससी आणि एसटी उमेदवारांसाठी ९ जागा आणि ईडब्यूी एससाठी (आर्थिक मागास) ५ जागा राखीव आहेत.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय २५ ते ४० दरम्यान असावे.
शैक्षणिक पात्रता
कॉर्पोरेट क्रेडिट रिटेल बँकिंगच्या असिस्टंट जनरल मॅनेजर ग्रेड सी पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. तसेच एमबीए डिग्री असलेल्यांना प्राधान्य दिलं जाईल. या पदासाठी किमान सात वर्षे काम केल्याचा अनुभव गरजेचा आहे.
मॅनेजर बी ग्रेड पदांसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून डिग्री घेतलेली असावी, उमेदवाराकडे किमान चार वर्षे कामाचा अनुभव असावा.
निवड प्रक्रिया
आयडीबीआय बँकेत भरतीसाठी मुलाखत आणि ग्रुप डिस्कशननंतर उमेदवारांची निवड केली जाईल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.
पगार किती असेल?
आयडीबीआय बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर ग्रेड सी या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना महिन्याला १,०५, २८० रुपये मासिक वेतन दिले जाईल, याच पदासाठी मेट्रो शहरांसाठी निवड झाल्यास उमेदवारास १,५७,००० रुपये वेतन असेल. यानंतर मॅनेजर ग्रेड बी पदासाठी उमेदवारांना महिन्याला ९३,९६० रुपये वेतन असेल, तर मेट्रो शहरात निवड झाल्यास हाच पगार १,१९,०० रुपये असेल.