छोट्या पडद्यावर सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत. हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतही टीआरपीची स्पर्धा सुरू आहे. त्यानुसार, मालिका, रिएल्टी शोबाबत निर्णय घेतले जात आहेत. सोनी वाहिनीदेखील आता काही मालिकांबाबत मोठा निर्णय घेणार आहे. काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. तर, काही जुन्या मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. छोट्या पडद्यावरील एसीपी प्रद्युमन, दया-अभिजीत पुन्हा एकदा दिसणार आहेत. सीआयडी मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे.
प्रसिद्ध कॉमेडियन झाकीर खानचा ‘आपका अपना झाकीर’ हा शो महिनाभरापूर्वी सुरू झाला होता. मात्र सोनी टीव्ही वाहिनीने तो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर सुंबूल तौकीर खानच्या ‘काव्या’सह अनेक मालिका अडचणीत येणार आहेत. लवकरच चॅनलवर अनेक मोठे बदल पाहायला मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात स्टार इंडियाचे गौरव बॅनर्जी यांनी सोनी नेटवर्कची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी सूत्रे हाती घेताच चॅनलमध्ये अनेक मोठे बदल करण्याचे त्यांनी ठरवले आहे. Indiatoday.in च्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या अखेरीस बरेच बदल पाहायला मिळतील. सध्या क्रिएटिव्ह टीम नवीन कंटेंट तयार करण्यात व्यस्त आहे. तसेच प्रेक्षकांना पुन्हा सोनीकडे वळवण्यासाठी काम सुरू असल्याची माहिती आहे.
कोणत्या मालिका घेणार निरोप?
चॅनलवरील सर्व फिक्शन शो बंद करण्यात आले आहेत. ‘काव्या- एक जज्बा, एक जुनून’, ‘पुकार दिल से दिल तक’ आणि ‘ज्युबली टॉकीज’ या डेली सोपचे चित्रीकरण आधीच बंद करण्यात आले आहे. आता, या मालिकांचे चित्रीकरण पूर्ण झालेल्या मालिकांचे भाग प्रसारीत केले जाणार आहेत. त्यामुळे काही आठवडे या मालिकांचे प्रसारण होणार आहे.
सीआयडी आणि इतर कोणती मालिका करणार कमबॅक?
सोनी चॅनेलवर काही मालिका निरोप घेणार असतील तर त्यांच्या ऐवजी आता दुसऱ्या मालिका प्रसारीत होणार आहेत. सोनीवर जुन्या लोकप्रिय मालिका पुन्हा सुरू होणार आहेत. सीआयडी या मालिकेचे जुने एपिसोड्स पुन्हा दाखवले जाणार आहेत. या यादीत ‘क्राइम पेट्रोल’चाही समावेश आहे. याशिवाय ‘मेरे साई’ या शोलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते, आता तो पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या जुन्या मालिकांना चांगला टीआरपी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच जुन्या मालिका प्रसारीत होणार असल्याची माहिती आहे.
बिग बी अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला कौन बनेंगा करोडपतीचा 16 वा सीझन बंद करण्यात येणार नाही. त्याशिवाय, ‘इंडियाज बेस्ट डान्सर’, ‘इंडियन आयडॉल’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.