
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : मनसे आणि ठाकरे गटाच्या ऐतिहासिक विजयी मेळाव्याच्या पूर्वसंध्येला राज्याचे राजकारण अधिकच तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. ‘जय गुजरात’ या कालच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेत राऊतांनी थेट शिंदेंना “कच्चं मडकं” असे संबोधित करत फडणवीस आणि शिंदे दोघांनी माफी मागावी, अशी मागणी केली.
ठाकरे एकत्र येण्याआधी राऊतांचा आक्रमक अवतार
वरळी डोम येथे होणाऱ्या विजयी मेळाव्यात १८ वर्षांनंतर ठाकरे घराण्याचे दोन्ही वारसदार – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या ऐतिहासिक क्षणाकडे लागले आहे. या महत्त्वपूर्ण घडामोडीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
‘जय गुजरात’ विधानावरून भडकले राऊत
काल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’ असा नारा दिला होता. या विधानावर संजय राऊतांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
“हे विधान मराठी माणसाच्या अस्मितेचा अपमान करणारे आहे. मिस्टर शिंदे, तुम्ही मराठी माणसाचा अपमान करत आहात,” असा थेट आरोप त्यांनी केला.
फडणवीस यांना टोला – “ते शिंदेंना गोत्यात आणत आहेत”
राऊत म्हणाले,
“एकनाथ शिंदे हे महायुतीच्या मंत्रिमंडळातील ‘कच्चं मडकं’ आहेत. त्यांच्याकडून जी वक्तव्ये केली जात आहेत, ती फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच होत आहेत. फडणवीस हेच शिंदेंना अडचणीत आणत आहेत.”
“मुंबई निर्माण झाली आहे मराठी माणसाच्या घामातून”
“मुंबईचे मोठे योगदान पारशी समाजाचे असले तरी मराठी माणसाचा त्यात मोठा वाटा आहे. श्रमिक, गिरणी कामगार, मराठी मजूर यांच्या घामातून ही मुंबई उभी राहिली आहे, केवळ उद्योगपतींच्या पैशातून नाही,” असे सांगत राऊतांनी गुजराती समाजाचे उल्लेख करत अप्रत्यक्ष टीका केली.
माफी मागा! – शिंदे व फडणवीस यांच्यावर दबाव
संजय राऊतांनी ठामपणे म्हटले की,
“शिंदे यांनी सर्वप्रथम मराठी माणसाची माफी मागावी. आणि त्यांच्या या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या फडणवीसांनीही महाराष्ट्राची माफी मागावी.”
तसेच,
“फडणवीस जितके बोलतील, तितकेच अडचणीत येतील. त्यांना आता शांत राहणंच योग्य आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.
राजकीय पार्श्वभूमी तापते
राऊतांच्या या घणाघाती टीकेमुळे ठाकरे-मनसे एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय वातावरणात चांगलाच गहजब माजला आहे. ‘जय गुजरात’ वाद, मराठी अस्मिता, आणि ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा हे सर्व मिळून महायुती सरकारला चोहोबाजूंनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते आहे.