
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : महाराष्ट्रात हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, मराठी विरुद्ध हिंदी वादाने गंभीर वळण घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदित राज यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “राज ठाकरेंचं मराठीवर प्रेम नाही, तर त्यांचं फक्त राजकारणावर प्रेम आहे,” असे वादग्रस्त विधान त्यांनी केलं.
गेल्या काही दिवसांपासून मराठीतून न बोलणाऱ्या दुकानदारांवर मनसे कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या कारवायांनी हा वाद अधिक गडद झाला आहे. मिरारोड येथे एका हिंदी भाषिक दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा वाद आणखी चिघळला.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना उदित राज म्हणाले, “राज ठाकरे यांच्या मुलांनी कोणत्या माध्यमातून शिक्षण घेतलं, हे पाहिलं पाहिजे. हे लोक केवळ मराठी भावना भडकवून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरेंसारख्या नेत्यांनीही भाषेच्या वादातून आपलं अस्तित्व उभं केलं.”
उदित राज यांनी स्पष्ट केलं की, “माझ्या विधानाचा ठाकरे गटाशी असलेल्या आघाडीसोबत काहीही संबंध नाही. आमची आघाडी वेगळी आहे आणि ती कायम राहील. मात्र मी जो मुद्दा मांडतोय, तो वास्तव आहे.”
दरम्यान, सोशल मीडियावरही मराठी-हिंदी वादाला उधाण आलं असून, प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी मराठीप्रेमी आणि राज ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “मी गेली ३० वर्षं मुंबईत राहतो, पण अजूनही मराठी शिकलेलो नाही. आणि जोपर्यंत तुम्ही मराठी मारणाचं नाटक करत राहाल, तोपर्यंत शिकणारही नाही. काय करायचं ते करा,” असं उघड आव्हान त्यांनी दिलं.
राज्य सरकारकडून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या हालचाली, भाजपकडून परप्रांतीयांना दिला जाणारा पाठिंबा, आणि त्याविरोधात शिवसेना (ठाकरे गट), मनसे यांची भूमिका यामुळे हा वाद पुढच्या काळात आणखी भडकण्याची चिन्हं आहेत.