जिल्हा बँकेवर काढण्यात येणाऱ्या “चाबूक मोर्चा” साठी आटपाडी तालुक्यात जनजागृती

0
10

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर मंगळवार दिनांक २५ रोजी आम. गोपीचंद पडळकर व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या वतीने विविध मागण्या बाबत सांगली येथे “चाबूक मोर्चा” काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. आज आटपाडी येथे आठवडा बाजार असल्याने या मोर्चा बाबत शेतकरी वर्गाला माहिती होण्यासाठी  ध्वनीक्षेपणाद्वारे माहिती देण्यात आली.

सांगली जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या ठेवी आहेत. परंतु बँकेद्वारे म्हणावा तसा शेतकरी वर्गाला कर्ज पुरवठा केला जात नाही. कधी-कधी एक लाख रुपयांच्या कर्जासाठी शेतकऱ्यांला अधिकारी वर्गाकडून नाकीनऊ आणले जाते. परंतु तेच कर्ज जर राजकारणी लोकांचे असल्यास सकाळी अर्ज, दुपारी कर्ज मंजूर आणि सांयकाळ पर्यंत खात्यात पैसे दिले जातात.

सध्या जिल्हा बँकेकडून थकीत कर्जाची वसुली सुरु आहे. वसुली अधिकारी हे वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जात असून वसुलीसाठी आग्रही आहेत. तर दुसऱ्या बाजूला राजकारणी लोकांशी संबधित कर्जासाठी कोणताही तगादा लावला जात नसल्याचा आरोप आम. गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

जिल्हा बँकेकडून जिल्हा बाहेरील संस्थांना मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला गेला आहे. बँकेमध्ये फर्निचर, अनावश्यक नोकरभरती, राजकारणी लोकांच्या संस्थेची थकलेली कर्जे याबाबत जिल्हा बँकेवर दिनांक २५ रोजी “चाबूक मोर्चा” आम. गोपीचंद पडळकर व माजी मंत्री सदाभाऊ खोत त्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे.