
माणदेश एक्सप्रेस/कोल्हापूर : राष्ट्रपुरुषांचा अवमान करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा प्रशांत मुरलीधर कोरटकर (रा.नागपूर) याची कळंबा कारागृहातून सुटका झाली. न्यायालयाने अटी-शर्तींसह ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कोरटकरचा जामीन मंजूर केला होता. मात्र कागदपत्रांची पुर्तता न झाल्याने त्याचा कारागृहातील दोन दिवस मुक्काम वाढला होता. अखेर कडक पोलिस बंदोबस्तात कोरटकरला कारागृहातून बाहेर आणण्यात आले. यावेळी कारागृह परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दुपारी २.१५ मिनिटांनी कोरटकरला कारागृहातील अंडासेल मधून बाहेर काढले. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्याला पोलिसाच्या स्वाधीन केले अशी माहिती कारागृहातील वरिष्ठ अधीक्षक नागनाथ सावंत यांनी दिली.
न्यायालयाने कोरटकरला बुधवारी (दि.९) जामीन मंजूर केला होता. मात्र, जामिनाचे पत्र कळंबा कारागृहात पोहोचू शकले नव्हते, त्यामुळे त्याची सुटका होऊ शकली नव्हती. कागदपत्रांची पूर्तता होताच आज, शुक्रवारी सुटका झाली. सुनावणीवेळी कोरटकरवर न्यायालय परिसरात हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे कडक पोलिस बंदोबस्तात त्याला कारागृहातून बाहेर काढले.
फिर्यादी आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव आणू नये. पुरावे नष्ट करू नयेत. चौकशीत पोलिसांना सहकार्य करावे. पोलिसांच्या परवानगीशिवाय बाहेरगावी जाऊ नये, अशा अटींचे पालन करण्याच्या सूचना त्याला न्यायाधीशांनी दिल्या आहेत.