“पवार इज द पावर…..” खासदार निलेश लंके यांची शरद पवारांसमोरच तुफान फटकेबाजी

0
7

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात लक्षवेधी ठरलेल्या दोन्ही लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही उमेदवार पहिल्यांदाच संसदेत जात आहेत. बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले बजरंग सोनवणे आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले निलेश लंके. या विजयानंतर बजरंग सोनवणेंचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जायंट किलर असा केला. तर, निलेश लंकेंबाबत बोलताना शरद पवारांनीही विरोधकांना मिश्कील टोला लगावली. दरम्यान, लंके उमेदवार असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत इंग्रजी हा मुद्दा चांगलाच चर्चेत ठरला होता. त्यावरुन, लंकेंना प्रश्नही विचारले जात आहेत. आता, निलेश लंकेंनी आपल्या भाषणात थेट इंग्रजी वाक्य बोलून अप्रत्यक्षपणे सुजय विखेंना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन सोहळा यंदा अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी, शरद पवारांसह अनेक मान्यवरांची भाषणे झाली. त्यावेळी, बोलताना निलेश लंकेंनी विखे पाटील यांना टोला लगावला. कोणाचाही नाद करा, पण पवार साहेबांचा नाद करायचा नाही, असे म्हणत चक्क इंग्रजी वाक्य बोलून दाखवलं. त्यानंतर, सभागृहात एकच जल्लोष झाला. ”ये तो ट्रेलर है, विधानसभा अभी बाकी है. पवार साहेबांनी चेंडू टाकला आणि समोरच्यांचा त्रिफळा उडाला. नाद करायचा पण पवार साहेबांचा नाही बाळांनो, भले भले थकले. पवार इज द पॉवर… असे इंग्रजी वाक्य बोलून निलेश लंकेंनी थेट सुजय विखेंवर निशाणा साधला. कारण, सुजय विखेंनी निवडणूक प्रचारादरम्यान लंकेंवर टीका करताना, त्यांना इंग्रजी बोलता येत नसल्यावरुन खिल्ली उडवली होती. तर, संसदेत जायचं म्हटल्यावर इंग्रजी बोलता आलं पाहिजे, असेही ते म्हणाले होते. त्यामुळे, अहमदनगरच्या लोकसभा निवडणुकीत यंदा इंग्रजी भाषा हा मुद्दा चांगलाच गाजल्याचं दिसून आलं. त्यातच, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात संधी साधत निलेश लंकेंनी टीकाकारांना थेट इंग्रजीतून टोला लगावला. तसेच, आता मुंबईवर झेंडा, तेही बहुमताने फडकणार आहे. विधानसभेवर पवार साहेबांचा झेंडा फडकणार आहे. विधानसभेच्या आजच प्रचाराचा नारळ फुटला पाहिजे मी साहेबांना शब्द देतो, बाराचे बारा आणून दाखवतो”, असे आव्हानही त्यांनी स्वीकारलं आहे.

तर संसद बंद पाडतो – लंके
निलेश लंके म्हणाले, मी जे बोलतो ते करून दाखवतो. मी विकेट काढतो, मी खासदार झालो तेव्हा अनेकांना विचारलं खरंच खासदार झालो का ? पण साहेबांमुळे खासदार झालो. तुम्ही मला दिल्लीत नेऊन टाकले. जर संसदेत शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, तर संसद बंद पाडतो, आमचं काम हटके आहे. बघा हे आचारसंहिता आपल्याला कळत नाही. एकदा दिल्लीला जाऊन येतो, अंदाज घेऊन येतो कसा काय ते? निम्मा अंदाज घेऊन आलोय. आपण काम करणारा माणूस आहे. एकच ध्यानात ठेवा, पवार इज पॉवर आहे, असंही निलेश लंके यांनी सांगितलं.

हा कोण गडी संसदेत आणला – शरद पवार
“खर सागायचं म्हणजे निलेश लोकसभेत चालल्यानंतर मला काळजी एकाच गोष्टीची आहे. जे आमचे सभासद आहेत, त्यामध्ये जुने सभासद आहेत. त्यांना पार्लमेंटमध्ये सगळेजण नक्की विचारतील, हा कोण गडी याठिकाणी आणला. मी त्यांना सांगितलं, तिथे मराठीत सुद्धा भाषण करता येत. तुम्ही मातृभाषेत बोलू शकता. एकदा का माईक हातात आला तर निलेशजी मराठीमध्ये काय बोलतील याचा भरोसा नाही. त्याबद्दल कमतरता भासणार नाही”, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले.

पहा व्हिडीओ: