
माणदेश एक्सप्रेस न्यूज
नवी दिल्ली : पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या मोहिमेची माहिती दिली. तसेच ऑपरेशन सिंदूर संपलेले नसून जर पाकिस्तानने आगळीक केली, तर भारताकडून पुन्हा उत्तर दिले जाईल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये जवळपास १०० अतिरेकी मारले गेल्याचीही माहिती त्यांनी दिली. ऑपरेशन सिंदूर सुरू असल्यामुळे मृतांचा नेमका आकडा देण्यात आलेला नाही.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ऑपरेशन सिंदूरच्या यशाची माहिती देताना म्हटले की, या एअर स्ट्राईकमध्ये जवळपास १०० अतिरेकी मारले गेले आहेत. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मोहीम संवेदनशील असल्यामुळे याव्यतिरिक्त केंद्र सरकारकडून जादा माहिती दिलेली नाही.
राजनाथ सिंह या बैठकीत म्हणाले की, भारताला परिस्थिती आणखी चिघळायची नाही. पण जर पाकिस्तानने काही आगळीक केल्यास भारत शांत बसणार नाही. या बैठकीला राजनाथ सिंह यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि इतर काही मंत्री उपस्थित होते. तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जुन खरगेंनीही बैठकीला हजेरी लावली होती.
पंतप्रधान मोदी या बैठकीला गैरहजर राहिल्याबद्दलचा प्रश्न काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विचारला. ते म्हणाले, पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने बोलावलेल्या पहिल्या बैठकीलाही पंतप्रधान उपस्थित नव्हते. जर ते स्वतःला संसदेपेक्षा वरचढ समजत असतील तर काही हरकत नाही. याबद्दल त्यांना नंतर विचारणा करू. पण या संकटाच्या काळात आम्ही कुणावरही टीका करू इच्छित नाही.