खासदार रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आली. गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेने गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीनचीट द्यायचे बाकी आहे. हे सरकार ओवाळून टाकलेले सर्व भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहेत आणि आमची ताकद किती वाढली हे दाखवत आहेत. सगळ्या लोकांवरती कारवाई केली. ईडी, सीबीआयचे खटले दाखल केले. त्यात वायकरांचाही समावेश आहे. वायकर ईडी, सीबीआयला घाबरून पळून गेले. आता त्यांना क्लीनचीट देण्यात आली. मोदी आणि महाराष्ट्रातील फडणवीसांच्या सरकारमध्ये दुसरे काय होऊ शकते, अशी टीका त्यांनी केली आहे.
खोटे गुन्हे दाखल केल्याचे भाजपने मान्य करावे
ते पुढे म्हणाले की, हे काय कायद्याचे राज्य आहे का? तुमची आमच्या लोकांवर खोटे खटले दाखल केले. त्यांना भीती दाखवून तुमच्या पक्षात घेतल्याचे आता मान्य करा. मात्र आमच्यासारखे काही लोकं दबावाला बळी पडले नाहीत. अजित पवार पळून गेले, मुख्यमंत्री पळून गेले, त्यांना कारवाईची भीती होती. भाजपने आता मान्य करावे की, आम्ही यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते. वायकरांवरील गुन्हे आता का मागे घेतले? आमच्यावरील पण गुन्हे मागे घ्या, असेही संजय राऊत म्हणाले.
किरीट सोमय्या फडतूस माणूस
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणेल की, किरीट सोमय्या फडतूस माणूस आहे. वायकरांचा खटला मागे घेतला, यावर त्यांनी बोलावे. ते जर सत्यवचनी असतील तर त्यांनी हे भ्रष्ट्राचारी आपल्या पक्षात घेऊन वॉशिंग मशीनमध्ये धुवायचे काम सुरु आहे, त्यावर बोलावे, असे आव्हान संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना दिले. गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेने गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, अनेक गुन्हे त्यांनी गैरसमजातून दाखल केले आणि लोकांना तुरुंगात जावे लागले. पोलीस, EOW गैरसमजातून गुन्हा दाखल करू शकतात का? EWO च्या प्रमुखांवर खटला दाखल केला पाहिजे, असे आव्हानही त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.